वृत्तसंस्था/समरकंद, उझबेकिस्तान
जर्मनीच्या दिनारा वॅग्नरसोबतच्या बरोबरीनंतर ग्रँडमास्टर आर. वैशाली आघाडीवर राहण्यात यशस्वी झाली आहे, परंतु येथे झालेल्या फिडे महिला ग्रँड स्विसच्या चौथ्या फेरीच्या समाप्तीनंतर रशियाची कॅटेरिना लॅग्नोही तिच्यासोबत आघाडीवर आली आहे.
लॅग्नोने पांढऱ्या सोंगट्यांसह खेळताना चीनच्या युक्सिन साँगचा पराभव केला आणि पाचव्या फेरीत भारतीय खेळाडू पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळणार असल्याने ती आणि वैशाली यांच्यातील हा एक महत्त्वाचा सामना असेल. दिनाराविऊद्धच्या सामन्यात गतविजेत्या वैशालीने ग्रुनफेल्ड बचावाचा अवलंब केला आणि काळ्या सोंगाट्यांसह खेळताना फारसे काही केले नाही. जर्मन खेळाडूही फारसा प्रभाव पाडू शकली नाही. वैशालीकडे खेळण्यासाठी काहीही निर्णायक चाली नव्हता आणि बरोबरी हा एक योग्य निकाल होता.
खुल्या विभागात अव्वल मानांकित आर. प्रज्ञानंदला जगातील सर्वांत तऊण ग्रँडमास्टर अमेरिकेच्या अभिमन्यू मिश्राने बरोबरीत रोखले. प्रज्ञानंदने त्याच्या तऊण प्रतिस्पर्ध्याला जवळजवळ हरवले होते, परंतु भारतीय वंशाच्या खेळाडूने सामना बरोबरीत सोडविणे सोपे नसतानाही कठोर प्रतिकार केला. शेवटी मिश्राने कडेकोट किल्ल्यासारखी स्थिती निर्माण करण्यात यश मिळवले आणि खेळ 57 चालींमध्ये बरोबरीत सुटला.
दोन खेळाडूंमधील द्वंद्वयुद्धात विश्वविजेता डी. गुकेशने अर्जुन एरिगेसीशी बरोबरी साधली, ज्याने काळ्या रंगाच्या सोंगाट्यांसह उत्तम तयारी दाखवली. गुकेशला कदाचित अनुकूलता मिळाली असती, परंतु एरिगेसी ती परिस्थिती तत्परतेने टाळली. 46 चालींनंतर हा सामना बरोबरीत सुटला. जगातील सर्वांत मजबूत स्विस स्पर्धेत सात फेऱ्या शिल्लक असताना इराणच्या परहम मगसुदलूने स्थानिक खेळाडू नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हशी झालेल्या संघर्षपूर्ण बरोबरीनंतर अर्ध्या गुणाची आघाडी कायम ठेवली आहे आणि तो 3.5 गुणांवर पोहोचला आहे.
खुल्या विभागात गतविजेता विदित गुजरातीने देखील युक्रेनच्या अनुभवी वासिल इव्हानचूकवर विजय मिळवून पुनरागमन केले. विदित, एरिगेसी, गुकेश आणि प्रज्ञानंद हे तीन गुणांसह आणि उझबेकिस्तानच्या अब्दुसत्तोरोव्ह आणि नोदिरबेक याकुबबोएव्ह, हंगेरीचा रिचर्ड रॅपोर्ट, जर्मनीचा मॅथियास ब्लूबॉम, स्वित्झर्लंडचा निकिता विट्युगोव्ह आणि तुर्कीचा प्रतिभावान यागीझ कान एर्डोगमस यांच्यासह दुसऱ्या स्थानावर आहेत. 8 लाख 55 हजार अमेरिकन डॉलर्सच्या बक्षीस रकमेसह 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेतील खुल्या आणि महिला अशा दोन्ही विभागांतील दोन स्थानेही या ठिकाणी पणाला लागलेली आहेत.









