वृत्तसंस्था/समरकंद, उझबेकिस्तान
येथे होणाऱ्या फिडे ग्रँड स्विसच्या पहिल्या फेरीत भारताच्या अव्वल मानांकित आर. प्रज्ञानंदचा सामना अमेरिकन ग्रँडमास्टर जेफरी झिओंगशी होईल, तर जागतिक विजेता डी. गुकेश फ्रेंच खेळाडू एटिएन बाकरोटविऊद्ध पूर्ण जोर लावण्याची शक्यता आहे. खुल्या गटात 116 आणि महिला गटात 56 खेळाडू या 8 लाख 55 हजार अमेरिकन डॉलर्सच्या एकत्रित बक्षिसांच्या स्पर्धेत लढतील. यापैकी 6 लाख 25 हजार अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे खुल्या गटासाठी आहेत. ही स्पर्धा पुढील कँडिडेट्स स्पर्धेच्या पात्रता फेरीचा भाग असून आतापर्यंतच्या या सर्वांत मजबूत स्विस ओपन स्पर्धेत जगातील अव्वल तीन क्रमांकाचे खेळाडू झळकणार नाहीत. हल्ली क्लासिकल बुद्धिबळाला नापसंती दर्शविणारा आणि आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळणे टाळणारा अव्वल क्रमांकाचा मॅग्नस कार्लसन याची अनुपस्थिती समजण्यासारखी आहे.
फॅबियानो काऊआना कँडिडेट्ससाठी पात्र ठरल्यामुळे त्याला ऊर्जा जपण्यासाठी या स्पर्धेला मुकावे लागत आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील हिकारू नाकामुरा कँडिडेट्समध्ये स्थान मिळविण्यासाठी जानेवारी, 2026 पर्यंतच्या त्याच्या रेटिंग सरासरीवर अवलंबून आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे नाकामुरा अमेरिकेत अतिशय कमी दर्जाची स्पर्धा खेळला आणि त्याचे सर्व सामने जिंकून रेटिंग पाच गुणांनी वाढवले. या स्पर्धेतून खुल्या आणि महिला विभागातील दोन स्थाने पक्की होणार आहेत. तरीही या तिघांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने अव्वल तीन मानांकित खेळाडू म्हणून भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे, जे जगातील कोणत्याही खुल्या स्पर्धेत कधीही पाहायला मिळालेले नाही. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला प्रज्ञानंद, पाचवा क्रमांकावरील अर्जुन एरिगेसी आणि सध्या जगात सहावा क्रमांकावर असलेला गुकेश हे सर्व किताब मिळविण्याच्या दृष्टीने शक्ती पणाला लावतील. खुल्या गटात महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुखचा समावेश आहे.









