वृत्तसंस्था/ समरकंद, उझबेकिस्तान
भारतीय ग्रँडमास्टर निहाल सरिनच्या कँडिडेट स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या आशांना धक्का बसला आहे. कारण फिडे ग्रँड स्विसच्या नवव्या फेरीत तो फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाकडून पराभूत झाला. स्पर्धेत फक्त दोन फ्रेया शिल्लक असताना, निहालचे सहा गुण झाले आहेत आणि आता कँडिडेटसाठी उपलब्ध असलेल्या आठ स्थानांमध्ये जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने पहिल्या दोन खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी त्याला त्याचे शेवटचे दोन सामने जिंकावे लागतील.
निहालने जवळजवळ सात तास झुंज दिली आणि अलिरेझाने तडाखा देण्यापूर्वी खेळाच्या अंतिम टप्प्यात पडती बाजू सावरून जवळजवळ बरोबरी साधली होती. आर. प्रज्ञानंदशी अमेरिकन ऑन्डर लियांगने बरोबरी साधली आणि आता आघाडीच्या दोन खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला चमत्काराची आवश्यकता आहे. तथापि, प्रज्ञानंद अजूनही कँडिडेटमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. कारण या वर्षीच्या स्पर्धा गुणांचा विचार करता त्याने त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे. खुल्या विभागात भारताच्या आशा आता निहाल आणि अर्जुन एरिगेसीवर आहेत, ज्याने अमेरिकेच्या सॅम्युअल सेव्हियनला पराभूत करताना उत्तम खेळ केला.
दरम्यान, अलिरेझाने जर्मन जोडी व्हिन्सेंट कीमर आणि मॅथियास ब्लूबॉम आणि डचमन अनीश गिरी यांच्यासह 6.5 गुणांनिशी संयुक्त आघाडी घेतली आहे, तर निहाल आणि अर्जुन त्यांच्या मागे असलेल्या खेळाडूंच्या गटात आहेत. जागतिक विजेता डी. गुकेशसाठी हा आणखी एक विसरण्यासारखा दिवस ठरला. कारण पाचव्या दिवशीही त्याला विजयाने हुलकावणी दिली आणि आर्मेनियाच्या रॉबर्ट होव्हानिसियानशी बरोबरीवर समाधान मानावे लागले.
महिला विभागात आर. वैशालीने चीनच्या युक्सिन साँगशी बरोबरी साधली आणि 6.5 गुणांसह ती संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर राहिली. रशियाच्या कॅटेरिना लॅग्नोने बिबिसारा असाउबायेव्हासोबतचा सामना बरोबरीत सोडविला आणि स्वत:ला सात गुणांपर्यंत पोहोचवले. रशियन खेळाडूने वैशाली, युक्सिन आणि बिबिसारा यांना पिछाडीवर टाकलेले असून या सर्व खेळाडू अर्ध्या गुणांनी मागे आहेत.









