वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला मॅग्नस कार्लसन येथे होणाऱ्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. फिडेने खेळाडूंना जीन्स परिधान करून स्पर्धा खेळण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने या स्पर्धेची दारे कार्लसनसाठी खुली झाली आहे. जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेतील एका सामन्यात जीन्स परिधान करून आलेल्या कार्लसनला फॉर्मल पँट परिधान करण्यास सांगण्यात आले हेते. त्यास त्याने नकार दिल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर लगेच हा निर्णय आलेला आहे.
पाच वेळच्या विश्वविजेत्याला जीन्स परिधान केल्याबद्दल 200 डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला होता. स्पर्धेच्या मूळ नियमांनुसार जीन्स परिधान करून येणे हे स्पष्टपणे प्रतिबंधित होते. ‘फिडे’चे प्रमुख आर्काडी ड्वोरकोव्हिच यांनी म्हटले आहे की, अधिकाऱ्यांना पोशाखाच्या योग्यतेबद्दल निर्णय घेताना अधिक लवचिकता प्रदान करण्याचा दृष्टीने चाचणी म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. असे असले, तरी अधिकृत ड्रेस कोडचे पालन करणे आवश्यक आहे. त्यात शोभनीय किरकोळ बदलांना परवानगी आहे. यामध्ये विशेषत: जॅकेटशी जुळणाऱ्या उचित जीन्सचा समावेश होऊ शकतो, असे ड्वोरकोव्हिच यांनी ‘एक्स’वर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जलद बुद्धिबळ स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर कार्लसनने ब्लिट्झ विभागातून अंग काढून घेतले होते. परंतु आता तो आपल्या विजेतेपद राखण्यासाठी परत येईल. ‘वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिप’मध्ये मॅग्नस कार्लसन सहभागी होईल याची पुष्टी करताना फिडेला आनंद होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. कार्लसनने रविवारी फिडचे उपाध्यक्ष आणि महान भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची भेट घेतली होती.









