रयत संपर्क केंद्रांतून उपलब्ध : शेतकऱ्यांना आवाहन
बेळगाव : पीक कर्जासाठी एफआयडी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कर्ज हवे असल्यास प्रथमत: एफआयडी क्रमांक मिळविणे गरजेचे बनले आहे. रयत संपर्क केंद्रातून शेतकऱ्यांना एफआयडी क्रमांक दिला जात आहे. शिवाय इतर शासकीय योजनांसाठीदेखील एफआयडी अनिवार्य करण्यात आली असून शेतकऱ्यांनी एफआयडी क्रमांक घ्यावा, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. किसान सन्मान योजनेचा लाभ घेणारे शेतकरी अधिक आहेत. दरम्यान, खात्याकडे एफआयडी क्रमांक नोंद झाली आहे. शेतीचा सातबारा इतर बाबींचीदेखील खात्याकडे नोंद आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक पाहणी उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पीक कर्ज उपलब्ध होते. मात्र आता पीक कर्जासाठी एफआयडी क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.
यंदा पावसाअभावी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कर्जाची परतफेड करणेदेखील अशक्य झाले आहे. दरम्यान, रब्बीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज आवश्यक बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. मात्र प्रथमत: एफआयडी क्रमांक मिळविणे आवश्यक आहे. कृषी खात्याकडे सातबारा उतारा, आधारकार्ड आणि बँक पासबुक लिंक आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे. कृषी खात्याने डिजिटल यंत्रणेचा वापर वाढविला आहे. विशेषत: सातबारा आणि इतर कागदपत्रे ऑनलाईन केली आहेत. सातबारा पीक पाहणी उतारा, आधारकार्ड आणि इतर बाबींची नोंद असली तरी एफआयडी क्रमांक गरजेचा बनला आहे. शिवाय शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी एफआयडी बंधनकारक आहे.









