प्रतिनिधी /कुंकळ्ळी
किटल, फातर्पा येथील श्री भूमिपुरुष शांतादुर्गा किटलकरीण संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार 3 ते रविवार 5 फेब्रुवारीपर्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भक्तगणांनी मोठय़ा प्रमाणात सहकुटुंब, मित्रमंडळीसह उपस्थित राहून श्रींच्या उत्सवाचा लाभ घेतला.
चोहोबाजूंनी वनराईने नटलेल्या परिसरात आणि बाळ्ळीमठ येथील राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले असून नवसाला पावणारे श्रद्धास्थान म्हणून या देवीची ख्याती दूरवर पसरलेली आहे. वार्षिक उत्सवाच्या दरम्यान आपला नवस फेडण्यासाठी भक्तांनी नेहमीप्रमाणे मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली. देवस्थान समितीने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ती काळजी घेतली होती. वाहतूक व्यवस्था, पार्किंगसाठी भरपूर जागा, चोहोबाजूंनी दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची सोय, कचरा विल्हेवाट व्यवस्था आदींकडे समितीने लक्ष दिल्याने हा जत्रोत्सव यशस्वीपणे पार पडला.
नव्या कार्यकारिणीच्या अधिपत्याखालील ही पहिलीच जत्रा होती. देवस्थानचे नवे अध्यक्ष योगेश नाईक देसाई, सचिव विराज राऊत देसाई, खजिनदार प्रयेश नाईक देसाई, मुखत्यार शांता नाईक देसाई यांच्या कार्यकारिणीने हा उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. जत्रोत्सवात पहिल्या दिवशी 3 रोजी सकाळी यजमानांस प्रायश्चित विधी, गणपतीपूजन, प्रार्थना, श्री भूमिपुरुषास लघुरुद्र सेवा, श्रींची महापूजा व नंतर दुपारी महाप्रसाद. रात्री महाप्रसाद, श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक, श्रींची सिंहरथातून मिरवणूक, आरती, प्रसाद आणि कोकणी नाटकाचा प्रयोग आदी कार्यक्रम झाले.
4 रोजी सकाळी नवचंडी वाचन, पूर्णाहुती, दुपारी श्रींची महापूजा, आरती व महाप्रसाद, रात्री महाप्रसाद, नंतर श्रींची विजयरथातून मिरवणूक, आरती, प्रसाद व कोकणी नाटक, तर 5 रोजी सकाळी अभिषेक, श्रींची महापूजा, आरती, दुपारी महाप्रसाद, रात्री महाप्रसाद, नंतर ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम झाले. त्यानंतर रात्री 11 च्या सुमारास श्रींची महारथातून मिरवणूक व तीर्थप्रसाद होऊन उत्सवाची सांगता झाली. महारथ मिरवणुकीवेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









