नरकासुर दहनाने झाली दिवाळीची सुरुवात : पाच दिवस चालणार दीपोत्सवाचा आनंदोत्सव
पणजी : गोव्यात आज पहाटे नरकासुर दहनाने दिवाळीचे आनंदपर्व सुरु झाले असून पुढील चार दिवस हा दीपोत्सवातील आनंदोत्सव चालणार आहे. उद्या मंगळवारी दि. 21 रोजी लक्ष्मीपूजन असून बुधवार दि. 22 रोजी पाडवा आहे. त्यानंतर गुरुवार दि. 23 रोजी भाऊबीज होणार आहे. दिवाळीनिमित्त घरोघरी आकाशकंदील, विविध रंगांचे दिवे, पणत्या, रांगोळी यांची सजावट दिसून येत आहे. राज्यातील सर्व प्रमुख शहरात म्हणजे राजधानी पणजीसह फोंडा, मडगाव, वास्को, म्हापसा तसेच गावोगावी नरकासुरांच्या प्रतिमा तयार करुन पहाटे त्यांचे दहन करण्यात आले. घरोघरी पारंपरिक पद्धतीनुसार तिखट, गोड पोहे आणि विविध गोडधोडाचा समावेश असलेल्या फराळाची लज्जत चाखून दिवाळी साजरी झाली. अनेकांनी आपापल्या घरांवर विद्युत रोषणाई केली असून तोरणे बांधली आहेत.
घरोघरी मंगलमय वातावरण
गोवागोवी तसेच शहरातही नरकासुर दहनाने व घरोघरी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नानाने दिवाळीचे पर्व सुरु झाले. मित्रमंडळी, शेजाऱ्यांना बोलावून आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. फराळाचे जिन्नस लाडू, चकली, करंजी, पोहे यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात झाली. मिठाई खरेदीसाठी देखील गर्दी दिसून आली. सरकारी कर्मचारीवर्गाला बोनसचा लाभ झाला. काही खासगी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना बोनस दिला. काल रविवार असून देखील बाजारात गजबजाट दिसून आला. इतर रविवारी मात्र फारशी गर्दी नसते. आकाशकंदीलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात झाली.
नरकासुर प्रतिमा पाहण्यासाठी गर्दी
दिवाळीच्या पूर्वसंध्येला आणि रात्री म्हणजे काल रविवारी विविध ठिकाणचे नरकासुर पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी रात्रभर नरकासुर प्रतिमा नाचवल्या जात होत्या. सायंकाळपासून रात्रभर संगीताच्या तालावर नाचून नरकासुर फिरवण्यात आले आणि पहाटे त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत दहन करण्यात आले.
पोलिसांच्या मागदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष
नरकासुर स्पर्धा किंवा दहन आणि इतर गोष्टींसाठी पोलिसांकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली होती. त्याचे परिपूर्ण पालन झाले नसल्याचे दिसून आले. बहुतेक ठिकाणी अक्राळ-विक्राळ मोठे नरकासुर तयार करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी कानठळ्dया बसवणारे कर्णकर्कश संगीत लावण्यात आले होते. ते संगीत काल रविवारी काही ठिकाणी दिवसभर चालू होते. रात्री उशिरा नरकासुर पाहण्यासाठी गर्दी झाल्यामुळे राजधानीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली.
नरकासुरावर पावसाचे आक्रमण, आयोजकांचा हिरमोड
राजधानी पणजीत काल रविवारी रात्री 8 वा.च्या सुमारास काही वेळ जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे नरकासुर भिजले आणि त्यांचे नुकसान झाले. आयोजकांची धावपळ आणि तारांबळ उडाली तसेच नरकासुर पाहण्यासाठी आलेल्या लोकांनाही पावसात भिजावे लागले. राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने तेथील नरकासुर पाण्याने भिजले. अचानक आलेल्या या पावसामुळे दिवाळी आणि नरकासुर आयोजकांच्या आनंदावर विरजण पडले. तयार करण्यात आलेल्या नरकासुरांवर प्लास्टिक घालण्यात आले. त्यामुळे ते पाहण्यासाठी फिरणारे निराश झाले. पावसासोबत ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या चमचमाट देखील अनुभवास आला.









