प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा येथील प्रसिद्ध मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त येत्या 2 मे रोजी साजरे होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्षे हे फेस्त मर्यादित स्वरुपात साजरे करण्यात आले होते. यंदा या महामारीचे सावट कमी झाल्याने सेंट जेरॉम चर्च व्यवस्थापनाकडून फेस्तची जय्यत तयारी सुरू केली आहे.
गेल्या 22 एप्रिल पासून चर्चने फेस्तच्या अनुषंगाने धार्मिक प्रार्थना तसेच नोवेना सुरू केली आहेत. ही नोवेना रविवार दि. 1 मे पर्यंत सुरू राहतील. सोमवार दि. 2 मे रोजी फेस्तदिनी सकाळी 9 वा. फेस्तची प्रार्थना होईल. तसेच सकाळी 5.30, 6.45, 8 व 11 वा. आणि सायं. 4 व 5.15 वा. चर्चेमध्ये प्रार्थना होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल. शिवाय दिवसभर मिलाग्रीस सायबिणीचे दर्शन घेऊन भाविकांना तेल व मेणबत्ती अर्पण करता येईल. गोव्यात तसेच शेजारील राज्यांमध्ये मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त प्रसिद्ध आहे. फेस्तानिमित्ताने दरवर्षी मोठय़ा संख्येने लोक सेंट जेरॉम चर्चमध्ये येऊन सायबिणीला तेल व मेणबत्ती अर्पण करून तिचे दर्शन घेतात. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे पण गेली 2 वर्षे या परंपरेत खंड पडला होता.
कोरोना महामारीमुळे सरकारने सर्व धार्मिकस्थळे बंद ठेवण्याची सूचना केली होती. तसेच चर्च संस्थेकडून आलेल्या निर्देशानुसार गेली दोन वर्षे हे फेस्त मर्यादित स्वरुपात म्हणजे फक्त धर्मगुरूंनीच साजरे केले होते.









