आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी शहरातील बायपास रस्त्यालगत असलेल्या स्वराज्य कृषी सेवा केंद्राला लागलेल्या आगीत तब्बल 40 लाखांचे नुकसान झाले. सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक कयास आहे. या आगीत शेतीशी निगडीत महागडी औषधे, खते जळून खाक झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी उजेडात आली.
आटपाडी शहरातील मुख्य बायपासच्या सुरेश इण्डेनकडील रस्त्यालगत शिवाजी शहाजी जाधव यांच्या मालकीचे स्वराज्य कृषी सेवा केंद्र हे औषधे, खते, बियाणांचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास या दुकानातून धूर येत असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ दुकानाचे मालक शिवाजी जाधव यांना मोबाईलवर संपर्क साधुन माहिती दिली. त्यानंतर शिवाजी जाधव, शुभुराजे पाटील, विजय पाटील, अनिल जगदाळे व अन्य सहकाऱ्यांनी दुकानाकडे धाव घेतली. आतून धुराचे लोट बाहेर येत होते. थोड्यावेळाने शटर उघडून आतमध्ये पाहणी केल्यानंतर औषधे, खते, बियाणे, किटकनाशके, बुरशीनाशके, रासायनिक औषधांसह अन्य साहित्य जळत असल्याचे निदर्शनास आले. विजेचा मुख्य प्रवाह बंद केल्यानंतर शिवाजी जाधव व सहकाऱ्यांनी दुकानातील आग आटोक्यात आणली. या आगीत तब्बल 40 लाखाहून अधिकचे नुकसान झाले असून या घटनेची माहिती जाधव यांनी आटपाडी पोलिसांना देत तक्रार दिली.