नागपट्टणम ते कांकेसंथुराईदरम्यान करता येणार प्रवास
वृत्तसंस्था/ नागपट्टणम
तामिळनाडूच्या नागपट्टणम आणि श्रीलंकेच्या कांकेसंथुराईदरम्यान फेरीसेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सेवेच्या उद्घाटनसोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील झाले. नागपट्टणम आणि कांकेसंथुराईदरम्यान फेरी सेवा भारत-श्रीलंका यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.
भारत आणि श्रीलंका संस्कृती, व्यापाराच्या प्रदीर्घ इतिहासात भागीदार राहिले आहेत. आम्ही भारत आणि श्रीलंकेदरम्यान राजनयिक आणि आर्थिक संबंधांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात करत आहोत. ही नौका सेवा सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना दृढ करणारी असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी आमचा दृष्टीकोन परिवहन क्षेत्राच्या पलिकडचा आहे. युपीआयमुळे भारतात डिजिटल पेमेंट जीवनातील एक पद्धत ठरली आहे, आम्ही युपीआय आणि लंका पेला जोडून फिनटेक सेक्टर कनेक्टिव्हिटीवर काम करत आहोत असे मोदींनी नमूद केले आहे.
केंद्रीय जहाजबांधी आणि जलमार्ग तसेच आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी तामिळनाडूच्या नागपट्टणम आणि श्रीलंकेतील कांकेसंथुराईदरम्यान फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखविला आहे. या सोहळ्यात विदेशमंत्री डॉ. एस. जयशंकर देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील झाले. त्यांनी या सेवेला भारत आणि श्रीलंकेच्या लोकांदरम्यान संपर्कव्यवस्थेसाठी मोठे पाऊल ठरविले आहे.
महत्त्वपूर्ण पाऊल
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी या फेरीसेवेला भारत-श्रीलंकेदरम्यान कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल ठरविले आहे. दोन्ही देशांदरम्यान कनेक्टिव्हिटी यापूर्वी श्रीलंकेतील गृहयुद्धामुळे बाधित झाली होती, परंतु आता पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. यासंबंधी पंतप्रधान मोदींशी बोलणे झाले होते. या सेवेच्या शुभारंभासाठी पंतप्रधान मोदी आणि भारतीय शिपिंग निगमचे आभार मानतो असे विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.
भारताचा उदार अन् दूरदर्शी दृष्टीकोन
जाफनानजीक कांकेसंथुराईपर्यंत प्रवासी नौकासेवा सुरू झाल्याने लोकांमधील संपर्क वाढविण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे. कनेक्टिव्हिटी, सहकार्यावर लक्ष देण्यासोबत भारताचा स्वत:च्या शेजारी देशांसाठी उदार अन् दूरदर्शी दृष्टीकोन आहे. भविष्यात आम्ही ग्रिड कनेक्शन, पाइपलाइन आणि आर्थिक कॉरिडॉरवर विचार करत आहोत. याचबरोबर निश्चितपणे श्रीलंकेत सर्वांना समान अधिकारासोबत राहण्यासाठी समर्थन दिले जाणार असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
3.5 तासांचा प्रवास
हायस्पीड नौकेचे संचालन शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून केले जाणार आहे. या नौकेची क्षमता 150 प्रवाशांची असणार आहे. अधिकाऱ्यांनुसार नागपट्टणम आणि कांकेसंथुराई यांच्यात सुमारे 60 सागरी मैलाचे अंतर सागराच्या स्थितीच्या आधारावर सुमारे 3.5 तासांमध्ये कापले जाणार आहे.









