वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानात लोकप्रिय महिला टिकटॉकरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिचे नाव सुमीरा रजपूत असे आहे. तिला वीष देऊन मारण्यात आले आहे, असा आरोप तिच्या पंधरा वर्षे वयाच्या कन्येने केला आहे. ही घटना सिंध प्रांताच्या घोटकी जिल्ह्यात शनिवारी घडली आहे. त्यामुळे पाकिस्तानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्यांना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागते, हे आणखी एकदा सिद्ध झाले आहे. या टिकटॉकरवर तिने विशिष्ट व्यक्तीशी लग्न करावे असा दबाव आणण्यात येत होता. पण तिने विवाह करण्यास नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या कन्येने केला आहे. ही टिकटॉकर घटस्फोटित होती. काही दिवसांपूर्वी सना युसूफ नामक इंटरनेट इन्फ्ल्युएन्सरचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. धर्मांध टोळ्यांचे हे कृत्य असल्याचा आरोप आहे. मात्र, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास स्थानिक प्रशासन कचरत असल्याने या टोळ्या मोकाट सुटल्या आहेत. रजपूत हिच्या मृत्यूनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, त्यांच्यावर एफआयआर नोंद करण्यात आलेला नाही, अशी माहिती घोटकी जिल्ह्याच्या स्थानिक पोलिसांनी दिली.









