मिरामार येथे अर्भक सोडून देण्याचे प्रकरण : पुरावे पोलिसांच्या हाती
पणजी : मिरामार येथील स्व. मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाजवळ जे अर्भक सोडून देण्यात आले होते, त्याविषयी पोलिसांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत काही भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून एका संशयित महिलेला पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी यासंदर्भात शोधमोहीम सुरू केली असून अद्याप अधिक माहिती उघड केलेली नाही. मात्र चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत ज्या महिलेने हे दहा दिवसांचे अर्भक समाधीस्थळाजवळ उघड्यावर सोडून दिले होते, तिचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळण्याची शक्यता आहे. हे अर्भक नेमके कोणी सोडले व कोणाच्या घरी ते जन्मले, इथपर्यंतचा शोध पोलीस यंत्रणा करीत आहे. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर गोव्यात सर्वत्र एकच खळबळ माजली होती. त्यावर बरीच चर्चा झाली होती. अखेरीस पालीस ज्या महिलेच्या शोधात होते त्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे. पणजी पोलीस या संदर्भात आणखी काही पुरावे गोळा करीत आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेली महिला संशयित असून कदाचित ती माफीची साक्षीदार बनू शकते. ज्यांच्याकडे मूल जन्माला आले ते त्यांनी कोणाला दिले व कोणी त्या महिलेला दिले की काय? असे अनेक तर्कवितर्क सध्या करण्यात येत आहेत. मात्र पोलीस एका निर्णयाप्रत येत असून संबंधित मातेलाही अटक होण्याची शक्यता आहे.








