सातारा :
सातारा एसटी बसस्थानकामध्ये गुरूवारी दुपारी पाच दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेतले. आणि अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.
सातारा एसटी स्टॅण्डमधून मुंबईला जाणाऱ्या फलाटच्या शेजारी कचऱ्याचा ढिग आहे. या ढिगात गुरूवारी दुपारी एक स्त्री जातीचे अर्भक काही प्रवाशांना आढळून आले. हे पाहून प्रवाशांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ सातारा शहर पोलिसांना यांची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून या अर्भकाला ताब्यात घेतले. त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. यावेळी ही अर्भक पाच दिवसाचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. एसटी स्टॅण्डमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे हे अर्भक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.








