मग तुम्ही असाल आजारी, आसपास मिळतील असे अनेक रुग्ण
एकेकाळी स्मार्टफार्स किंवा साधारण फीचर फोन्स देखील नव्हते. तेव्हा माणसाच्या जीवनात इतकी गुंतागुंत देखील नव्हती. सतत कॉल करून कुणी त्रास देत नव्हता. तसेच माणूस देखील सदैव मोबाइलमध्ये डोकावलेला नसायचा. जेव्हापासून फोनचा वापर वाढला आहे, तेव्हापासून लोकांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता तर मोबाइल हातात नसला तर माणूस अस्वस्थ होऊ लागतो. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर त्वरित सतर्क व्हा. कारण तुम्ही एका अशा आजाराने ग्रस्त आहात जो अत्यंत दुर्लभ आहे.
या आजाराने ग्रस्त असणारे अनेक लोक तुमच्या आसपास असतील. या आजाराला नोमोफोबिया म्हटले जाते, म्हणजेच फोनशिवाय राहण्याची भीती. या आजाराने ग्रस्त लोकांना सदैव आपण फोनपासून दूर होण्याची किंवा फोन चोरीला जाण्याची भीती सतावत असते. फोनची बॅटरी संपण्याची भीती देखील यात सामील आहे. याचबरोबर मोबाइल फुटण्याची भीती कायम वाटत असते. ही एकप्रकारची एंक्झाइटी असते, जी लोकांच्या मनात फोनवरून निर्माण होते.
हा एक दुर्लभ आजार मानला जातो, परंतु सद्यकाळात हा अत्यंत अधिक दिसून येणारा आजार ठरला आहे. मोबाइलचे व्यसन जडलेल्या लोकांना हा आजार असतो. एका संशोधनात अनेक युवक-युवतींचे अध्ययन करण्यात आले, ज्यात 23 टक्के युवक नोमोफोबिक असल्याचे आढळून आले. यातील 77 टक्के विद्यार्थी दिवसात सुमारे 35 वेळा स्वत:च्या फोनला वारंवार पाहत असल्याचे दिसून आले.
आजाराची लक्षणे
नोमोफोबियाची लक्षणे अनेक आहेत. फोनची नोटिफिकेशन वारंवार तपासणे, फोन स्वीच ऑफ न करणे, फोनला सर्वत्र स्वत:सोबत नेणे, फोन पूर्ण चार्ज झाल्यावरही वारंवार चार्ज करणे, फोन स्वत:कडे आहे की नाही हे वारंवार तपासून पाहणे, संकटाच्या काळात कुणाला फोन करता येणार नाही अशी चिंता सतावणे, वाय-फाय किंवा नेटवर्क नसण्याची भीती जाणवणे, सदैव फोन हरविण्याची भीती सतावणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजारांसाठी औषधांपासून अनेक प्रकारच्या थेरपी आहेत. यात लोकांना फोनशिवाय देखील आयुष्य असून ते जगणे अवघड नसल्याचे शिकविले जाते.