अधिकारी अनुपस्थित : चिरीमिरीची मागणी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
बेळगाव : कॅम्प येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ उपलब्ध होत नाहीत. तसेच परवानग्या मिळविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हात ओले करावे लागत असल्याने आरटीओ एजंटांनी शुक्रवारी कामबंद केले. यामुळे आरटीओ कार्यालय परिसरात शुकशुकाट पसरला होता. अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य न केल्यास यापुढे आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुचाकी, चारचाकी व व्यावसायिक वाहनांची नोंदणी, पुनर्नोंदणी यासह इतर कामांसाठी आरटीओंच्या सहीची गरज लागते. परंतु, सध्याचे आरटीओ वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार नागरिक व एजंटांमधून वारंवार केली जात आहे. आरटीओ वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यामुळे बऱ्याच वेळा आरटीओ कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. शुक्रवारी आरटीओ कार्यालयातील एजंटांनी एकत्रित येऊन कामबंद करण्याचा निर्णय घेतला. आरटीओ वेळेवर उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबली आहेत. त्यामुळे नागरिक व एजंटांमध्ये वाद होत आहेत. वेळेत काम पूर्ण न केल्यास नागरिकांकडून पैसेही मिळत नसल्याची तक्रार एजंटांनी करूनदेखील आरटीओ कार्यालयाचा कारभार काही सुधारण्यास तयार नाही. त्यामुळे शुक्रवारी कामबंद करण्यात आले. यामुळे कार्यालय परिसरात शुकशुकाट होता. जुन्याच फाईल पुढे सरकवल्या जात होत्या. परंतु, नवीन फाईल मात्र शुक्रवारी दाखल झाल्या नाहीत.
गोंधळ कधी संपुष्टात येणार?
वाहनांच्या संदर्भातील कामांसाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हात ओले करावे लागत आहेत. प्रत्येक फाईलवर वरकमाईची रक्कम पेन्सिलने लिहून दिली जात आहे. यामुळे एजंटही संतापले असून नागरिकांकडून पैसे घेणार तरी किती? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयातील हा गोंधळ कधी संपुष्टात येणार? असा प्रश्न केला जात आहे.









