रत्नागिरी :
महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट आणि असंवेदनशील कारभाराविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सोमवारी तीव्र आंदोलन केले. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शहरातही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून जनआक्रोश आंदोलनाद्वारे तीव्र संताप व्यक्त केला. उबाठा शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला.
‘पन्नास खोके, एकदम ओके‘, ‘भ्रष्ट सरकारचा निषेध असो‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. उबाठा शिवसेना उपनेते व माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, तसेच जिल्हा नेते सहदेव बेटकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, तात्या सरवणकर, उपजिल्हाप्रमुख रवी डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश कदम, संजय पुनसकर, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, रशिदा गोदड, राजश्री शिवलकर यांच्यासह तालुका संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, विभाग संपर्कप्रमुख, उपविभाग संपर्कप्रमुख, महिला आघाडी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
आंदोलकांनी सत्ताधारी मंत्र्यांच्या अनेक कथित गैरव्यवहारांची यादी सादर केली. यामध्ये समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील गैरव्यवहाराचे आरोप, तसेच कृषीमंत्री असताना रमी खेळणारे माणिकराव कोकाटे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे असंवेदनशील विधान करणाऱ्या मंत्र्यांचाही निषेध करण्यात आला.
- महाआघाडीविरोधात घोषणाबाजी अन्…
उबाठा शिवसेनेच्या या आंदोलनात सहभागी पदाधिकारी, शिवसैनिकांमध्ये महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधण्यासाठी जोश चढलेला होता. जोरदार घोषणाबाजी करण्यात सारेच तल्लीन होते. पण त्यावेळी जोश चढलेल्या साऱ्यांचेच भान हरपले आणि महायुती सरकार विरोधात घोषणा देतोय की आपल्याच महाविकास आघाडीचा निषेध करतोय याचे कोणालाच भान नव्हते. त्या घोषणाबाजीत या महाविकास आघाडीचे करायचे काय…खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर ही बाब लक्षात येताच काही स्वत:ची जीभ चावली तर काहींनी कपाळावर हात देखील मारले आणि आता यांना आवरा रे अशी म्हणण्याची पदाधिकाऱ्यांवर वेळ आली.








