ओल्ड गोवा नगरी सर्व तयारीनिशी सज्ज : यंदा शवप्रदर्शन असल्याने वेगळे महत्त्व
पणजी : ओल्ड गोवा येथील सुप्रसिद्ध संत झेवियर चर्चचे वार्षिक फेस्त उद्या 3 डिसेंबर रोजी वार्षिक परंपरेनुसार साजरे करण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याशिवाय झेवियर शवप्रदर्शन सोहळा यावर्षीच असून तो 23 नोव्हेंबरपासून चालू झाल्याने यंदाच्या फेस्ताला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. फेस्ताच्या निमित्ताने देश-विदेशात स्थायिक झालेले गोमंतकीय लोक गोव्यात येतात आणि फेस्तात सहभागी होतात. फेस्तासाठी लोक गोव्यात येण्यास सुरुवात झाली असून देशी-विदेशी पर्यटकांनादेखील हे फेस्त म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे. फेस्ताकरिता ओल्ड गोवा नगरी सजली असून विविध प्रकारची दुकाने, स्टॉल्स यांची रेलचेल तेथे दिसून येत आहे.
ओल्ड गोवाचे चर्च व तेथील फेस्त देश-विदेशात प्रसिद्ध असून महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यांतील लोकही या फेस्तासाठी मुद्दाम वाहने घेऊन येतात. फेस्ताच्या निमित्ताने विविध दुकानांची मोठी फेरी भरली असून लहान-मोठ्या अशा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी खेळांची विविध साधने तेथे उपलब्ध झाली आहेत. त्या फेरीत दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून आता शवप्रदर्शन सोहळ्यामुळे ती फेरी अनेक दिवस खुली राहणार आहे. फेस्ताची संधी साधून चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून तेथे भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.









