खानापूर रोडची उंची वाढल्याने समस्या, तज्ञांचा सल्ला घेऊन काम करण्याची माजी नगरसेवक गुंजटकर यांची मागणी
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचा विकास करताना विविध वाहिन्या भूमिगत घालण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र खानापूर रोडच्या काँक्रीटीकरणावेळी विविध वाहिन्या भूमिगत घालण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने गटारीचे पाणी येथील घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेऊन रस्त्याचा विकास करण्यात यावा, अशा विनंतीचा अर्ज माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापालिका आयुक्त व महापौरांना दिला आहे. तिसरे रेल्वे गेट ते बसवेश्वर चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. रस्त्याचा विकास होणे आवश्यक आहे. पण यापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी उंची वाढविण्यात आली होती. एक फुटाहून अधिक उंची वाढल्याने दुभाजकांची उंचीदेखील वाढविली होती. आता पुन्हा काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याची उंची पुन्हा वाढली आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून येथील रस्तादेखील बंद ठेवण्यात आला आहे. रस्त्याची उंची वाढल्यास परिसरातील रहिवाशांच्या घरात गटारीचे पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे रस्ता करण्यापूर्वी या सर्व अडचणीचा विचार करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या परिसरात विविध शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा असून रस्ता बंद ठेवल्यास विद्यार्थ्यांची देखील गैरसोय होऊ शकते. रस्ता व्हाईट टॅपिंग करण्यापूर्वी विविध भूमिगत वाहिन्या घालणे आवश्यक आहे. पण खानापूर रोडवरील काही वाहिन्या भूमिगत घालण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्युत वाहिन्या, टेलिफोन केबल, जलवाहिन्या, डेनेज वाहिन्या, गॅस वाहिन्या भूमिगत घातल्यानंतरच काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशा सूचना करण्यात याव्यात. विकासकामे राबविण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावा, असे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी निवेदनात म्हटले आहे.









