बिदर, मंगळूर दरोड्यानंतर बेळगावात दरोड्याचा धोका शक्य
बेळगाव : बिदरनंतर मंगळूर येथेही धाडसी दरोडा पडला आहे. विजापुरात दरोडेखोरांच्या एका टोळीवर पोलिसांनी गोळीबार केला आहे. केवळ दोन दिवसांत घडलेल्या या तीन घटना लक्षात घेता उत्तर कर्नाटकातील प्रमुख शहरात परप्रांतीय दरोडेखोरांच्या टोळ्यांचा वावर वाढल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर बेळगावातही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बिदर व मंगळूर येथील दरोडे प्रकरणांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. एटीएम व बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेशसह परप्रांतीय गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ दोन दिवसांत बिदर, विजापूर, मंगळूर येथे घडलेल्या घटनांनी कायदा व सुव्यवस्था कर्नाटकात अबाधित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हैद्राबाद येथेही गोळीबार करून पलायन केल्याची माहिती
गुरुवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी बिदर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या सीएमएस कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून 93 लाख रुपये असलेली ट्रंक पळविण्यात आली होती. गोळीबारात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री याच टोळीतील गुन्हेगारांनी हैद्राबाद येथेही गोळीबार करून पलायन केल्याची माहिती मिळाली आहे.
हटकले म्हणून बस व्यवस्थापकावरही गोळीबार
या गुन्हेगारांनी हैद्राबादहून छत्तीसगडमधील रायपूरला जाण्यासाठी खासगी आरामबसचे तिकीट काढले होते. बस व्यवस्थापकाला संशय आल्यामुळे त्याने दोघा जणांना हटकले म्हणून त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला आहे. गुरुवारी भरदिवसा बिदर येथे घडलेला थरार ताजा असतानाच सलग दुसऱ्या दिवशी मंगळूर येथे भरदिवसा एका सशस्त्र टोळीने बँकेवर दरोडा टाकला आहे. उल्लाळ के. सी. रोडवरील कोटेकारू बँकेवर सहा जणांचा समावेश असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीने पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून सुमारे 12 कोटी रुपये किमतीचे दागिने व रोकड पळविली आहे. दरोड्यानंतर फियाट कारमधून हे दरोडेखोर मंगळूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना घडली त्यावेळी बँकेत केवळ पाच कर्मचारी होते.
टोळी मध्यप्रदेशमधील
बिदर व मंगळूर येथील दरोड्याच्या प्रकारांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. शुक्रवारी पहाटे विजापूर येथेही दरोडेखोरांच्या एका टोळीवर पोलिसांनी गोळीबार केला आहे. गोळीबारात मध्यप्रदेशमधील महेश नामक एक दरोडेखोर जखमी झाला आहे. बुधवारी मध्यरात्री जैनापूर पुनर्वसन केंद्रातील एका घरावर सशस्त्र टोळीने दरोडा घातला होता. यावेळी घरमालकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. शुक्रवारी पहाटे विजापूर पोलिसांनी टोलप्लाझाजवळ दरोडेखोरांच्या टोळीवर गोळीबार केला आहे. या टोळीतील चौघेजण फरारी झाले असून ही टोळी मध्यप्रदेशमधील असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व जिल्ह्यातही पोलिसांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगावातही खबरदारी घेण्याची गरज
केवळ दोन दिवसांत कर्नाटकातील तीन वेगवेगळ्या शहरात घडलेल्या घटना लक्षात घेता परप्रांतीय दरोडेखोरांच्या टोळ्यांचा वावर वाढल्याचे दिसून येते. बेळगावातही यापूर्वी चन्नम्मानगर येथील एका बँकेवर दरोडा टाकण्यात आला होता. हा प्रकारही भरदिवसा घडला होता. त्याचा तपास लागला नाही. बेळगाव शहर व जिल्ह्यातही दरोडेखोरांची धास्ती वाढली असून पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबरच टोलनाक्यांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण बिदर, मंगळूरमधील घटना लक्षात घेता दरोडेखोरांनी निवांतपणे टोलनाके पार केले आहेत. पोलीस यंत्रणेला चकवण्यात गुन्हेगार यशस्वी ठरले आहेत. बेळगावातही खबरदारी घेतली नाही तर गुन्हेगारांचा धोका वाढणार आहे.









