शाळांच्या शैक्षणिक सहलींना प्रारंभ : परिवहनला बसेसची कमतरता : खासगी वाहनांचा आधार
बेळगाव : नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या जातात. त्यामुळे हा काळ परिवहनसाठी व्यावसायिक हंगाम म्हणून ओळखला जातो. या काळात परिवहनच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होते. मात्र, यंदा शक्ती योजनेमुळे बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे परिवहनला व्यावसायिक हंगामापासून दूर राहावे लागणार आहे. डिसेंबर, जानेवारीदरम्यान विविध पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. शिवाय शैक्षणिक सहलींचेही आयोजन केले जाते. त्यामुळे परिवहनच्या बसेसची मागणी अधिक असते. मात्र, यंदा शक्ती योजना सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बसेसचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ लागली आहे. त्यातच आता शैक्षणिक सहलींना बस पाठविताना परिवहनचे तीनतेरा वाजू लागले आहेत.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पर्यटनस्थळांसाठी परिवहनच्या दैनंदिन 40 ते 50 बसेस धावतात. मात्र, यंदा बसची कमतरता असल्यामुळे केवळ दहा ते पंधरा बसेस धावू लागल्या आहेत. शाळांना सहलींसाठी बसेस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, परिवहनकडे बसेसचा तुटवडा असल्यामुळे बस उपलब्ध करून देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शक्ती योजनेमुळे महिलांचा प्रवास वाढला आहे. महिला बेंगळूर, म्हैसूर, विजापूर, श्रवणबेळगोळ, महाबळेश्वर यांसह इतर ठिकाणी फिरू लागल्या आहेत. दसरा, गणेशोत्सव, दिवाळीनंतर बसेस सहलींसाठी धावतात. त्यामुळे या विशेष बससेवेतून परिवहनलाही समाधानकारक महसूल प्राप्त होतो. मात्र, यंदा परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता जाणू लागल्याने सहलीसाठी बसेसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाला नाईलाजास्तव खासगी बसेस बूक कराव्या लागत आहेत. परिवहनकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, यंदा बसेस मिळत नसल्यामुळे खासगी वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही बसू लागला आहे.
बससेवेवर अतिरिक्त ताण
शैक्षणिक सहलींना दररोज 10 ते 15 बसेस धावू लागल्या आहेत. मात्र, अधिक बसेस उपलब्ध करणे अवघड आहे. बसवाहक, बसचालक आणि बसेसची कमतरता आहे. त्यामुळे मागणी असूनदेखील शैक्षणिक सहलींना बसेस पाठविणे कठीण झाले आहे. शक्ती योजनेमुळे बससेवेवर अतिरिक्त ताण वाढला आहे.
– के. के. लमाणी (डीटीओ, बेळगाव)









