अनेक ठिकाणी लटकणारी धोकादायक झाडे : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे धोका वाढला
वाळपई : गोवा बेळगाव दरम्यानच्या भागांना जोडणारा चोरला घाट मार्ग हा महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात या महामार्गावर दरडी कोसून अनेकवेळा मार्ग बंद होण्याचा प्रकार घडतो. यामुळे प्रवासी वर्गाला ताटकळत रहावे लागते. यामुळे रस्त्याच्या बाबतीत अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असते. सध्या पाऊस सुरू झालेला आहे. गेल्या चार दिवसांपासून या घाट परिसरात मुसळधार पाऊस लागत आहे. यामुळे दरडी कोसळण्याचा धोका आहे, असे असतानाही अद्यापत सार्वजनिक बांधकाम खात्याने या मार्गावरील दरडी हटविण्यासाठी कंत्राटदार नेमलेला नाही. यामुळे कदाचित दरडी कोसळण्यास सुऊवात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल निर्माण झालेला आहे. गोवा व बेळगाव या महामार्गावर येणारा चोरला घाट परिसर पावसाळ्यात धोकादायक बनतो. यापूर्वी अनेक वेळा दरडी कोसळून महामार्ग बंद होण्याच्या घटना घडल्या. यामुळे ताबडतोब यंत्रणेची व्यवस्था करून दरडी हटवून वाहतूक सुरू करण्यात आली होती. यंदा मात्र साबांखात्याने या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.
दरडी कोसळल्यास कोण हटविणार?
घाट माथ्यावर गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. घाट परिसरामध्ये दरडीची माती हळुहळू कोसळण्यास सुऊवात झालेली आहे. त्याचप्रमाणे अनेक झाडे रस्त्यावर कोसळण्याच्या स्थितीत आहेत. हे प्रमाण वाढल्यास महामार्ग कधीही बंद होऊ शकतो. अशावेळी सरकारची यंत्रणा यासाठी सतर्क आहे का? अशा प्रकारचा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या मार्गाची जबाबदारी असलेल्या विभागाने अद्याप कंत्राटादाराची नियुक्ती केलेली नाही. या संदर्भाची निविदा नुकतीच जारी केली होती. त्यासाठी काही कंत्राटदाराने बोली लावली होती. मात्र अद्याप कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे सध्या या महामार्गावर निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचा प्रवासी वर्गांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी धोकादायक झाडांच्या फांद्या रस्त्यावर लटकलेल्या स्थितीत आहेत. रात्री अपरात्री या फांद्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. सध्या घाटमार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्याचप्रमाणे या भागामध्ये गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस लागत असल्यामुळे दरडी कोसळण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी दरडीची माती हळूहळू रस्त्यावर कोसळू लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यास वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे, असे भाजीची वाहतूक करणारे वसंत गावडे यांनी सांगितले.









