ही ब्रिटनमधील एका गावाची कहाणी आहे. या गावातील लोक दुपार झाली की स्वत:ला घरात कोंडून घेतात. उकाड्यामुळे ते असे करतात असे मुळीच नाही. केवळ भीतीपोटी ते तसे करतात. पॉन्टिप्रिड असे या गावाचे नाव आहे. या गावातील बहुतेक सर्व लोकांची अशी श्रद्धा आहे, की दुपारी घराबाहेर पडल्यास कोणते ना कोणते संकट त्यांच्यावर कोसळते. ही समजूत इतकी खोलवर आणि पिढ्यानपिढ्या रुजलेली आहे, लोक ती सोडण्यास तयार नाहीत.
मात्र, ही समजूत अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. या समजुतीमागे एक महत्वाचे कारण आहे. या गावातील तरुण काही दशकांपूर्वी अत्यंत नशेबाज होते. भर दुपारी अंमली पदर्थांची नशा करुन गावभर हिंडणे आणि रस्त्यांवरुन जाणाऱ्यांना त्रास देणे, मारहाण करणे असा त्यांचा कार्यक्रम असे. त्यामुळे कुटुंबवत्सल लोक दुपारी घराबाहेर जाण्यास घाबरु लागले. तेव्हापासून दुपारी घराबाहेर पडायचे नाही, अशी परंपराच निर्माण झाली. आजही काही प्रमाणात नशेबाज तरुण रस्त्यांवर दुपारी दंगा करतात. मात्र, हे प्रमाण कमी झाले आहे. तरीही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात वर्षानुवर्षे बसलेली भीती दूर झालेली नाही. म्हणून बहुतेक सर्व लोक दुपारी घरातच राहतात. आपली कामे किंवा व्यवसाय ते पहाटेपासून दुपारपर्यंतच्या कालावधीत करतात. त्यानंतर या गावात सामसूम होते.









