रेल्वेतून येणाऱया मासळीवर नाही नियंत्रण तपासणी न होताच मासळीची विक्री
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात सध्या मासेबंदी जारी आहे. या पार्श्वभूमीवर शेजारील राज्यांतून गोव्यात मासळी आयात केली जाते. पण, या मासळीची तपासणी केली जात नसल्याचे उघड झाले आहे. माशांची तपासणी केली जात नसल्याने फॉर्मेलिनची भीती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (एसजीपीडीए) माशांची तपासणी करण्यासंदर्भात असहायता दर्शविली आहे. शेजारील राज्यांतून आयात केल्या जाणाऱया माशांची तपासणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय एसजीपीडीएने घेतला आहे. मडगावच्या घाऊक मासळी मार्केटच्या बाहेर काही घाऊक मासळी विक्रेते मासळी विक्री करतात. त्याची देखील तपासणी केली जात नसल्याचे अन्न व औषध प्रशासनने (एफडीए) स्पष्ट केले आहे.
मासळीची तपासणी होत नसल्याने संताप
मासेमारी बंदी लागू असल्याने शेजारील राज्यातून गोव्याच्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात माशांची आयात केली जाते. मात्र, या माशांची फॉर्मेलिनसाठी तपासणी केली जात नाही. या माशांची गुणवत्ता तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही. यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गोव्यात आयात केले जाणारे मासे फॉर्मेलिनमुक्त आहेत की नाही हे कळणे देखील कठीण होऊन बसले आहे. त्याचबरोबर ती मासळी खाण्यालायक असते की नाही याबाबतही कोणतेही नियंत्रण नाही माशांची पार्सल गुजरात आणि इतर राज्यांमधून रेल्वेमार्गे मडगावला आणली जातात.
कोणतीही तपासणी न होता परस्पर विक्री
दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या (एसजीपीडीए) मालकीच्या मडगाव येथील घाऊक मासळी मार्केटच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्केटपासून काही मीटर अंतरावर फॉर्मेलिनची कोणतीही तपासणी न करता घाऊक मासळी विक्री केली जाते. त्यामुळे हजारो मासे प्रेमींचा जीव धोक्मयात घालण्याचा हा प्रकार आहे. एसजीपीडीएनेही हतबलता व्यक्त करत ही बाब जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्केटबाहेरील मासळीची तपासणी कोणी करावी?
मडगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी असे स्पष्टपणे सांगितले आहे की घाऊक मासळी बाजाराबाहेरील काही मासळी विपेत्यांच्या मासळी क्रियाकलापांवर, विशेषतः इतर राज्यांतील विपेत्यांद्वारे हाताळलेल्या मासळी क्रियाकलापांवर कोणतीही तपासणी केली जात नाही, एफडीए केवळ घाऊक मासळी बाजाराच्या संकुलात प्रवेश करणाऱया माशांचीच तपासणी करतात.
रेल्वेकडेही तपासणी यंत्रणा नाही
सध्या मासेमारी बंदी लागू असल्याने बाहेरील राज्यातून रोज जवळपास 50 ते 60 वाहने मोठय़ा प्रमाणात मासळी घेऊन मडगावात प्रवेश करतात आणि घाऊक मासळी मार्केटवर तैनात असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाकडून त्याची कडक तपासणी केली जात आहे. मात्र, रेल्वेतून आयात केलेल्या जाणाऱया माशांची तपासणी केली जात नाही. हे मासे थर्माकोलच्या बॉक्समधून आयात केले जात आहेत. रेल्वेकडे सुद्धा हे मासे तपासण्याची यंत्रणा नाही.
गोव्यात सद्या केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतून मासे आयात केले जात आहेत. हे मासे वाहनातून आणले जातात व एफडीएच्या पथकाकडून तपासणी केली जाते. या पूर्वी मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात माशांची तपासणी केल्यानंतर फॉर्मेलिन युक्त मासे आढळून आल्याने प्रचंड गोंधळ माजला होता. त्यानंतर शेजारील राज्यातून आयात केल्या जाणाऱया माशांची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, रेल्वेतून आयात केल्या जाणाऱया माशांची मात्र तपासणी होत नाही. त्यामुळे फॉर्मेलिनची भीती कायम राहिली आहे.









