वडगाव येथे एकावर हल्ला : मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात कुत्र्यांची धास्ती आठवडाभरापासून सुरूच आहे. शनिवारी वडगावमधील रिद्धीसिद्धी मार्ग येथे एका पाळीव कुत्र्याने हल्ला करत एका व्यक्तीला जखमी केले. कुत्र्यांचे हल्ले सुरूच असल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण असून, महानगरपालिकेकडून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे आतातरी प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वडगाव येथे पत्ता विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकावर पाळीव कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये ती व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, परिसरात घबराट पसरली आहे. कुत्र्यांचे हल्ले सुरू असतानाही महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून, सर्वसामान्यांना वावरणे कठीण झाले आहे. एखाद्यावेळी कुत्र्याने चावा घेतल्यास उपचाराचा खर्च गरिबांना परवडणारा नसतो. त्यामुळे कुत्र्यांचा मनस्ताप वाढत आहे.
भटक्या व पाळीव कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात अनेकवेळा तक्रारी करूनदेखील महानगरपालिकेकडून योग्यत्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीमही अर्धवट पडली. त्यामुळे महानगरपालिकेला नागरिकांचा जीव इतका स्वस्त वाटतो का? अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
कुत्र्यांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच
मागील आठवडाभरात कुत्र्यांनी शहराला वेठीस धरले आहे. बापट गल्ली येथे 11 जणांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतल्याची घटना ताजी असतानाच अनेक व्यक्तींचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शहराच्या इतर भागातही कुत्र्यांमुळे मनस्ताप सुरूच आहे. त्यामुळे भटक्या व पाळीव कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.









