पंधरवड्यात शहरातील तिघांची लाखोंची लूट : बेंगळूरमध्ये बसून परदेशी नागरिकांनाही लुटले; व्यापक जागृती करूनही अनेकजण प्रकारांना बळी
बेळगाव : बेळगावात डिजिटल अरेस्टच्या घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी केवळ एपीके फाईलच्या माध्यमातून फसवणुकीचा जोर सुरू होता. आता पोलीस दलाच्या नावानेच सावजांना लाखो रुपयांना गंडविण्यात येत आहे. केवळ पंधरवड्यात घडलेल्या तीन घटनांनी खळबळ माजली आहे. व्यापक जागृती करूनही लोक डिजिटल अरेस्टच्या प्रकारांना बळी पडत आहेत. गेल्या पंधरवड्यात शहर सीईएन पोलीस स्थानकात डिजिटल अरेस्टच्या घटनांसंबंधी तीन एफआयआर दाखल झाले आहेत. कॅम्प येथील एका वृद्ध दाम्पत्याला गंडवून 31 लाख रुपयांहून अधिक रक्कम सायबर गुन्हेगारांनी ढापली आहे. मुंबई पोलिसांच्या नावे व्हॉट्सअप कॉल करून गुन्हेगारी प्रकरणात अडकविण्याची धमकी देत रक्कम उकळण्यात आली आहे.
अशोकनगर परिसरातील दोघा जणांची फसवणूक झाली आहे. एका गृहस्थाच्या बँक खात्यातून 19 लाख रुपये हडपल्याची घटना घडली आहे. या तिन्ही घटना पोलिसांच्या नावानेच अमलात आणल्या आहेत. कुठे दीपक शर्मा तर आणखी कोठे अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा वापर करीत अटक करण्याची धमकी देत मोठ्या प्रमाणात रक्कम गुन्हेगारांनी उकळली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळा-कॉलेजमध्ये सायबर गुन्हेगारीविषयी जागृती केली आहे. अनेक प्रमुख चौकांमध्येही फलकांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. राज्य व केंद्र सरकारांनीही डिजिटल अरेस्ट प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली आहे. अशा घटना टाळण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही डिजिटल अरेस्टचे प्रकार सुरूच आहेत.
आजवर डिजिटल अरेस्ट किंवा सायबर गुन्हेगारीचा एखादा प्रकार घडल्यानंतर या गुन्ह्यामागे हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यातील गुन्हेगारांचा सहभाग असणार, अशी शक्यता गृहीत धरून पोलीस यंत्रणा तपासाला लागत होती. आता बेंगळूरमध्येच कॉल सेंटरच्या नावे परदेशी नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकविणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. बेंगळूरमधून अमेरिका, कॅनडा आदी देशातील नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून ठकवणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातील 16 जणांना बेंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे राज्य सरकारने सायबर गुन्हेगारी थोपविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून बेंगळूर येथे सायबर कमांड सुरू केले आहे. आता तर सायबर क्राईम विभागाला स्वतंत्रपणे काम करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
बेंगळूरमधील कॉल सेंटरमध्ये बसून मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकांना ठकविण्यात येत होते. यासाठी वेगवेगळ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना गुन्हेगारांनी प्रशिक्षण दिले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गेल्या दोन वर्षांपासून हे कॉल सेंटर बेंगळूरमध्ये सुरू होते. दोन वर्षांनंतर या कॉल सेंटरमधील गुन्हेगारांना अटक झाली आहे. 41 कॉम्प्युटर, 41 मॉनिटर, 40 सीपीयू, 40 हून अधिक व्हीजीएस केबल, 21 लॅन केबल, 25 मोबाईल, ओळखपत्रे, 4 डिलिंक स्वीच असे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. गुजरात, महाराष्ट्र, मेघालय, मध्यप्रदेश, पश्चिम बंगालमधील तरुणांना या कॉल सेंटरमध्ये कामाला लावण्यात आले होते. प्रथमच बेंगळूर पोलिसांनी डिजिटल अरेस्ट प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. परदेशी नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून ठकविल्यानंतर येणारी रक्कम क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतविण्यात येत होती. कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने कॉल सेंटर चालविण्यात येत होते.
सायबिट्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीचा फलक लावून कॉल सेंटर चालविण्यात येत होते. वर्क इंडिया लिंक्ड इन पद्धतीच्या समाजमाध्यमावर नोकरीची संधी आहे, अशी जाहिरातबाजी करण्यात येत होती. वेबसाईटमध्ये काम मिळवून देण्याचे सांगून माहिती अपलोड करीत होते. युएसए, कॅनडासह वेगवेगळ्या देशांना ऑनलाईन माहिती पुरविण्यासाठी कॉल सेंटर चालविण्यात येत होते. वेगवेगळ्या राज्यातील तरुणांना बोलावून त्यांना 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जात होता. एकदा ही तरुणाई कामासाठी म्हणून दाखल झाली तर त्यांना तीन आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जात होते.
तीन आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर या कॉल सेंटरमध्ये काम करणारे तरुण प्रत्यक्ष कामाला लागत होते. युएस बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, युएस पोस्टल सर्व्हिस, युएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन फोर्स या नावे परदेशी नागरिकांशी संपर्क साधून मनी लाँडरिंग, ड्रग टॅफिकींगमध्ये तुम्ही अडकला आहात, या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल, कंपनी वॅलेटमध्ये अमूक रक्कम जमा करा, अशी सूचना देत फसवणूक केली जात होती. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. इतर सामान्य कॉल सेंटरप्रमाणेच त्यांना ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था होती,अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
बेळगावातही अनेक तरुणांना अटक
आजवर परदेशात, परराज्यात राहून सायबर गुन्हेगार डिजिटल अरेस्टचे प्रकार करीत होते.आता बेंगळूरमधील कॉल सेंटरच्या माध्यमातून त्यांनी परदेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. बेळगावातही अशा प्रकरणातील सायबर गुन्हेगारांना बँक खाते उघडून देणाऱ्या अनेक तरुणांना अटक झाली आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी गुन्हेगार आपल्याच गावातील तरुणाईचा गुन्ह्यासाठी वापर करीत आहेत. गुन्हेगारांची कार्यपद्धत बदलली आहे. खबरदारी घेतली नाही तर फसवणुकीचे प्रकार वाढण्याचाच धोका अधिक आहे.









