पॅराग्लायडिंगचा जिल्ह्यात भुदरगडमध्ये पहिल्यांदाच उपक्रम
byअनिल कामीरकर
गारगोटी : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पॅराग्लायडिंगचा उपक्रम भुदरगड किल्ल्यावर वन विभागाच्यावतीने सुरू करण्यात आला, काहीशी भीती तर मनात थाकधुक अशा वातावरणात कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून आकाशात झेप घेऊन किल्ले भुदरगडचा फेरफटका मारला, मात्र भीतीने धास्तावलेल्या कार्यकर्ते आणि पर्यटकांनी पालकमंत्री आबीटकर जमिनीवर स्थिरावताच त्यांना गराडा घालत जल्लोष केला.
भुदरगड किल्ल्यावर पर्यटकांना मिळणार ‘आकाश सफरीची संधी देण्यासाठी वन विभागाच्या पुढाकारातून पॅराग्लायडिंगच्या उपक्रमाला रविवारी पालकमंत्री आबीटकर यांच्या हस्ते प्रारंभकरण्यात आला. या उपक्रमामुळे किल्ले भुदरगड आता केवळ इतिहासप्रेमींचेच नव्हे, तर साहसी पर्यटकांचेही आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. आकाशात भरारी घेण्यासाठी किल्ला सज्ज झाला आहे.
या उपक्रमांतर्गत पर्यटकांसाठी दोन पॅराशूट आणि दोन पॅ रामोटरच्या सहाय्याने आकाश सफरीची अनोखी अनुभूती घेता येणार आहे. त्यासाठी हिमाचल प्रदेशातून अनुभवी पायलट तसेच उपकरणे भुदरगडला दाखल झाली आहेत. विमानातील इंधनाचा वापर करून हे उड्डाण केले जाणार आहे. एअर ट्रॅफिक कॉरिडोरनुसार निश्चित उंचीवरून किल्ल्याभोवतीचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना याद्वारे आकाशातून पाहण्याची संधी मिळणार आहे. गेल्या सोमवारी या प्रकल्पाची पहिली ट्रायल घेण्याचे नियोजन केले होते, मात्र अचानक बदललेल्या हवामानामुळे ती पुढे ढकलावी लागली. दरम्यान, ग्राऊंड तयारी व सुरक्षेच्या चाचण्या युद्धपातळीवर घेण्यात आल्या या प्रकल्पासाठी सुमारे ४० लाखांचा निधी खर्च होणार आहे. सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
स्थानिकांना प्रशिक्षणाची संधी
हिमाचल प्रदेशातील पायलट काही दिवस भुदरगड येथे थांबणार आहेत. धाडसी व होतकरू स्थानिकांना प्रशिक्षणासाठी हिमाचलला पाठवण्यात येणार आहे. भविष्यात स्थानिक पातळीवर पायलट तयार होऊन हा उपक्रम स्वयंपूर्ण स्वरूपात सुरू राहावा, असा वन विभागाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
भुदरगड व रांगणा गड पाहण्यास देशभरातून पर्यटक येतील : पालकमंत्री आबीटकर
भुदरगड तालुक्यास किल्ले भुदरगड आणि रांगणा गड हे लाभलेले वैभव आहे. शासन स्तरावरून यांचा वेगळ्या पद्धतीने विकास करण्यात येईल. त्यामुळे हे दोन्ही किल्ले पाहण्यासाठी देशभरातुन पर्यटक भुदरगडला येतील, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले.
किल्ले भुदरगडवर वन विभागाच्या पुढाकारातून पॅराग्लायडिंगचा उपक्रम राबवण्यात आला त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विविध साहसी उपक्रमांचा त्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढंगे, दत्ताजीराव उगले, युवा सेना प्रमुख विद्याधर परीट, तालुका प्रमुख संग्राम सावंत, बाबा नांदेकर, श्रीधर भोईटे, सुत गिरणीचे संचालक रामभाऊ शिवुडकर आदींसह प्रमुख उपस्थित होते. सुनिल किरोळकर यांनी आभार मानले.
किल्ल्यावर नव्या पर्यटन सुविधा
पर्यटन विकासाच्या दृष्टीने किल्ल्यावर अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तलावाच्या परिसराचे सुशोभीकरण, तळ्याकडे जाणारा रस्ता व मनोरा, पर्यटकांसाठी विसाव्याच्या झोपड्या, बोटिंग सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्वांच्या जोडीला आता पॅराग्लायडिंगचा उपक्रम सुरू झाल्यास भुदरगड किल्ला साहसी पर्यटनाचा नवा केंद्रबिंदू ठरणार आहे.








