कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी मिळेना ठेकेदार, मनपाची झाली पंचाईत
बेळगाव : शहर आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पादचारी, मोटारसायकलस्वार, शाळकरी मुले आणि नागरिकांना भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. कुत्र्यांचे कळप लहान मुलांसह महिलांवर हल्ला करत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून फिरणे कठीण झाले आहे. विशेष करून गणेशपूर, अनगोळ, टिळकवाडी, सदाशिवनगर, जाधवनगर भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. सकाळी, सायंकाळच्या वेळी फिरावयास बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच शाळेला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
इतकेच नव्हे तर मोटारसायकल चालकांचा पाठलाग करत कुत्र्यांचे कळप चावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा धोका वाढला आहे. शहर आणि उपनगरातील मांसाहारी हॉटेलमधील खरकटे जिकडे-तिकडे रस्त्याकडेला टाकले जात आहे. तशा ठिकाणी कुत्र्यांचे कळप वावरत आहेत. यामुळे बहुतांश कुत्री हिंस्त्र बनली आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात कुत्र्यांच्या बंदोबस्तात लाखो रुपयांची तरतूद केली जाते. मात्र याचा योग्यरित्या विनियोग होत नसल्याने कुत्र्यांपासून होणारी समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका संपुष्टात आला आहे. त्यामुळे मनपाकडून निविदा मागविण्यात आली होती. मात्र याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला फेरनिविदा काढण्याची वेळ आली आहे. सध्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणाऱ्या ठेकेदाराकडून कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी अधिक खर्च होत असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेकडून एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणासाठी 1450 रुपये ठेकेदाराला दिले जातात. मात्र त्यामध्ये वाढ करून 1800 रुपये देण्यात यावेत, अशी मागणी जुन्या ठेकेदाराने केली आहे. फेरनिविदेला प्रतिसाद न मिळाल्यास जुन्या ठेकेदारालाच कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा ठेका द्यावा लागण्याची शक्यता आहे.









