विदेशातील भाविकही देऊ शकणार देणगी
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरावरून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने बुधवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विदेशी अंशदान विनियमन अधिनियम 2010 अंतर्गत स्वैच्छिक देणगी प्राप्त करण्यासाठी गृह मंत्रालयाच्या एफसीआरए विभागाने मान्यता प्रदान केली आहे.
विदेशी स्त्राsतांकडून प्राप्त होणारी कुठलीही स्वैच्छिक देणगी केवळ भारतीय स्टेट बँकेच्या संसद मार्ग शाखेतच स्वीकार होणार आहे. अन्य कुठल्याही बँक किंवा भारतीय स्टेट बँकेच्या अन्य कुठल्याही शाखेत जमा करण्यात आलेली रक्कम स्वीकारण्यात येणार नसल्याचे ट्रस्टकडून ट्विट करत सांगण्यात आले आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून या ट्विटमध्ये विदेशी देणगी स्वीकारण्यात येणाऱ्या बँक खात्याची माहितीही दिली आहे. यात खातेधारक म्हणून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असे नाव आहे. तर हे खाते संसद मार्ग शाखेत आहे.
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पुढील वर्षी 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ट्रस्टकडून मंगळवारीच राम मंदिर उभारणीचे काम दर्शविणारी छायाचित्रे शेअर करण्यात आली होती. या छायाचित्रांमध्ये राम मंदिराची भव्यता अन् सुंदरता दिसून येते. राम मंदिराच्या केवळ एका हिस्स्याची निर्मिती जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. उर्वरित हिस्स्यांचे निर्मितीकार्य आणखी काही काळासाठी सुरू राहू शकते.









