क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
दोन लीग सामने शिल्लक असतानाच मुंबई सिटी एफसीने 2022-23 आयएसएल लीग फुटबॉल शील्डचे जेतेपद मिळविले. या स्पर्धेत मुंबई सिटीने निर्भेळ यश प्राप्त करताना एकाही सामन्यात पराभव स्वीकारला नाही. काल फातोर्डा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या लढतीत मुंबई सिटी एफसीने आरंभीच्या पिछाडीनंतर एफसी गोवाचा 5-3 असा पराभव केला.
मुंबई सिटी एफसीसाठी ग्रेग स्टिव्हर्टने दोन तर परेरा दियाझ, लालियानझुआला छांगटे व बदली खेळाडू विक्रम सिंगने तर एफसी गोवासाठी नोहा सदावूई, ब्रँडन फर्नांडिस व ब्रायसन फर्नांडिसने प्रत्येकी एक गोल केला. विजयाने मुंबई सिटीला 3 गुण प्राप्त झाले. त्यांचे 18 सामन्यांतून 14 विजय व 4 बरोबरीने 46 गुण झाले. दुसऱ्या स्थानावर असलेल्या हैदराबादचे 17 सामन्यांतून 36 गुण आहेत. आपले उर्वरीत तिन्ही सामने जरी हैदराबादने जिंकले तरी त्यांचे 45 गुण होतील. यामुळे आता दोन सामने शिल्लक असतानाच मुंबई सिटीने यंदाच्या हंगामातील लीग शील्डवर आपले नाव कोरले. एफसी गोवाचे 18 सामन्यांतून 27 गुण कायम आहेत.
पहिल्या सत्रातच उभय संघाकडून पाच गोल झाले. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला एफसी गोवाने गोल करून आघाडी घेतली. लांब पल्ल्यावरून मिळालेल्या चेंडूवर ताबा मिळवत नोहा सदावूईने मुंबई सिटीच्या संजीव स्टॅलीन, रॉयस्टन ग्रिफीथ व मेहताब सिंग व नंतर गोलरक्षक फुर्बा लाचेंपाला भेदले व गोल केला. नोहाचा हा गोल त्याचा स्पर्धेतील आठवा गोल होता. दोनच मिनिटांनी मुंबई सिटीला गोल बाद करण्याची संधीही मिळाली होती. यावेळी अहमद जाहूने दिलेल्या पासवर ग्रेग स्टिव्हर्टने मारलेला फटका एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगने अडविला.
सामन्याच्या 18व्या मिनिटाला मुंबई सिटीने बरोबरीचा गोल केला. बॉक्सच्या बाहेरून मिळालेल्या फ्रिकीकचा अचुक उपयोग करताना ग्रेग स्टिव्हर्टने यावेळी मात्र धीरज सिंगला भेदले व मुंबईचा बरोबरीचा गोल केला. त्यानंतर मध्यंतराला पच मिनिटे शिल्लक असताना तीन गोल झाले. प्रथम 40व्या मिनिटाला पेरेरा दियाझने लालियानझुआला छांगटेच्या पासवर धीरजला भेदून मुंबईचा आघाडीचा गोल केला. मात्र दोनच मिनिटांनी नोहाने दिलेल्या पासवर ब्रँडन फर्नांडिसने गोल करून एफसी गोवाला 2-2 अशी बरोबरी गाठून दिली. मध्यंतराला एक मिनिट शिल्लक असताना फ्रिकीकवर परत एकदा धीरजच्या चुकीचा फायदा घेत पेरेरा दियाझने मुंबईच्या तिसऱ्या व परत एकदा आघाडी घेणाऱ्या गोलाची नोंद केली.
दुसऱ्या सत्रात मुंबई सिटी एफसीने आणखी दोन गोल केले. प्रथम मिळालेल्या पेनल्टीवर लालियानझुआला छांगटेने मुंबई सिटी एफसीचा चौथा गोल केला तर बदली खेळाडू विक्रम सिंगने पाचवा गोल करून मुंबई सिटीचा विजय अधिक सोपा केला. शेवटच्या क्षणी एफसी गोवाच्या ब्रायसन फर्नांडिसने तिसरा गोल केला. दोन गोल केलेल्या ग्रेग स्टिर्व्हटची या सामन्यातील सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.









