क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
आपल्या शेवटच्या लीग सामन्यात डाऊनटाऊन हिरोजचा 3-0 असा आरामात पराभव करून एफसी गोवाने ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘नॉक आऊट’मध्ये प्रवेश मिळविला. काल गुवाहाटीतील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या लढतीत मध्यंतराला एफसी गोवाने दोन गोलांची आघाडी घेतली होती.
या सामन्यात एफसी गोवाचे प्रशिक्षक गौरमांगी सिंगने मागील नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरूद्ध खेळलेल्या पहिल्या अकरा खेळाडूंत सहा बदल केले. सामन्याच्या 19व्या मिनिटाला एफसी गोवाने आघाडीचा गोल केला. कार्लोस मार्टिनेझने पुरविलेल्या पासवर मुहम्मद नेमीलने 30 यार्डवरून प्र्रतिस्पर्धी गोलरक्षकाला भेदले व गोल केला.
त्यानंतर मुहम्मद नेमील व उदांता सिंगने संयुक्तपणे रचलेल्या चालीवर कार्लोस र्मर्टिंनेझने हेडरवर एफसी गोवाचा दुसरा गोल केला. दुसऱ्या सत्रात 72व्या मिनिटाला नोहा सदाउईने दिलेल्या पासवर कार्लोस मार्टिंनेझने दिशाहीन फटका हाणल्याने एफसी गोवाची तिसरा गोल करण्याची संधी हुकली. शेवटच्या क्षणी इंज्युरी वेळेतील शेवटच्या मिनिटाला कार्लोसच्या स्थानावर बदली खेळाडू म्हणून खेळण्यास आलेल्या देवेंद्र मुरगावकरने एफसी गोवाचा तिसरा गोल करून विजय अथिक सोपा केला.
या विजयाने एफसी गोवाला तीन गुण मिळाले. त्यांचे आता तीन सामन्यांतून 7 गुण झाले आहेत. या गटातील दुसरा बाद फेरी संघ गाठण्यासाठी नॉर्थईस्ट युनायटेड व डाऊनटाऊन हिरोज यांच्यात लढत होणार असून नॉर्थईस्टला बाद फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक आहे. अन्य एका लढतीत ईस्ट बंगालने पंजाब एफसीचा एकमेव गोलने पराभव केला. सामन्याच्या 22व्या मिनिटाला सिव्हेरियोने ईस्ट बंगालचा विजय गोल केला. या गटातून ईस्ट बंगालने बाद फेरीत प्रवेश मिळविला.









