ट्रम्प यांच्या व्यापारशुल्क धोरणावर केली होती टीका
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या मेरीलँड येथील निवासस्थानावर अमेरिकेची गुप्तहेर संस्था एफबीआयने धाड टाकली आहे. बोल्टन हे ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क धोरणाचे कडवे टीकाकार आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असावी, असा कयास आहे.
ही कारवाई एफबीआय प्रमुख कॅश पटेल यांच्या निर्देशावरून झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोणीही कायद्यावर वर नाही, असा संदेश या धाडीनंतर काही काळातच पटेल यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केला आहे. ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50 टक्के व्यापार शुल्कावर ‘ही एक मोठी चूक आहे’ अशा अर्थाची टीका बोल्टन यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या निक्की हेली यांनीही ट्रम्प यांच्या भारतासंबंधीच्या धोरणावर टीका केली आहे. भारताचा उत्कर्ष झाल्यास तो अमेरिकेसाठी आव्हान मानता कामा नये. प्रगत भारत मुक्तविचारी जगासाठी धोका नाही. त्यामुळे भारताला लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे मतप्रदर्शन निक्की हेली यांनी केले होते.
भारताला दूर सारणे चुकीचे
चीन आणि रशिया यांच्या समवेत भारताने जाऊ नये, यासाठी अमेरिकेने गेली तीन दशके प्रयत्न केले आहेत. हे सर्व प्रयत्न ट्रम्प यांच्या आततायी व्यापार शुल्क धोरणामुळे वाया जाणार आहेत. अमेरिकेचे हे सध्याचे धोरण अमेरिकेसाठीही घातक ठरणार आहे, अशी टीका बोल्टन यांनी काही काळापूर्वी केलेली आहे.
रशियाकडून तेल खरेदी केल्याने…
भारताने रशियाकडून कच्चे इंधन तेल खरेदी करण्यास गेल्या चार वर्षांपासून प्रारंभ केला आहे. सध्या भारत रशियाकडून प्रतिदिन 20 लाख बॅरल कच्चे तेल आयात करीत आहे. यामुळे रशियाला मोठ्या प्रमाणात पैसा मिळत आहे. परिणामी, रशिया युक्रेनशी युद्ध करण्यास समर्थ झाला आहे, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. तथापि, चीन रशियाकडून भारतापेक्षाही अधिक तेल घेत आहे. तसेच अनेक युरोपियन देश नैसर्गिक वायू रशियाकडून मोठ्या प्रमाणात घेत आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात अमेरिकेने कोणतीही मोठी कारवाई केलेली नाही. भारताला मात्र विनाकारण लक्ष्य केले जात आहे. हे अमेरिकेचे सध्याचे धोरण अनेक तज्ञांच्या टीकेचा विषय बनले असून हा मोठा पक्षपात आहे, अशी टीका होत आहे.









