दलित संघर्ष समितीच्या संचालकांचे प्रतिपादन
बेळगाव : देशात सध्या जातीनिहाय जनगणना ठळक चर्चेत आहे. जातीयवादी घटक याला विरोध करत आहेत. या विरोधाला आपला विरोध आहे, अशी माहिती कर्नाटक दलित संघर्ष समिती (आंबेडकर वाद)चे राज्य संचालक मावळ्ळी शंकर यांनी दिली. रविवारी सकाळी येथील सरकारी विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघटना वाढवून देश आपल्याच ताब्यात रहावा, याची व्यवस्था केली आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना समाजहिताची आहे. त्याच मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. जातीनिहाय जनगणनेमुळे लहान घटकांना अनुकूल होते. सरकारी व इतर क्षेत्रामध्येही सुविधा मिळतात. त्यामुळेच त्याला विरोध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी आरक्षण जारी करण्यासाठी आणखी दहा-पंधरा वर्षे लागतील, असे सांगू लागले आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीपासूनच आरक्षण जारी करण्याची मागणीही त्यांनी केली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या दलित संघर्ष समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा बेळगाव दौरा होता. यावेळी सिद्धाप्पा कांबळे, मल्लेश चौगुले, महादेव तळवार, महांतेश तळवार, सुरेश तळवार, गौतम पाटील, प्रा. के. डी. मंत्रेशी आदींसह अनेक जण उपस्थित होते.









