अपत्याचा वाढदिवस हा जसा त्याच्यासाठी आनंदाचा असतो, तसा तो त्याच्या मातापित्यांसाठीही असतो, ही बाब सर्वश्रुत आहे. त्या दिवशी कित्येक मातापिता घरात किंवा बाहेर पार्टीचे आयोजन करतात. नातेवाईकांना, हितचिंतकांना आणि परिचितांना आमंत्रित केले जाते. खाणेपिणे, नाचगाणी होतात. एकंदर मोठ्या उत्साहात हा प्रसंग साजरा केला जातो. जे लोक अधिक खर्च करण्याच्या स्थितीत नसतात, तेही त्यांच्या ऐपतीप्रमाणे हा दिवस साजरा करतातच. पण त्यादिवशीचा मुख्य कार्यक्रम हा भेटवस्तू देण्याचा असतो. आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी कोणती भेटवस्तू आणली आहे, याची त्या अपत्यालाही मोठी उत्सुकता असते.
मात्र, एका आईने आपल्या मुलाच्या वाढदिवशी त्याला आश्चर्यचकित करण्याच्या नादात एक अशी कृती केली आहे, की तिला यासाठी सोशल मिडियावर ‘ट्रोल’ व्हावे लागत आहे. तिने मुलाच्या वाढदिवशी त्याला त्याचा सावत्र बाप भेट म्हणून दिला आहे. ही महिला ब्रिटनमधील आहे. तिचे नाव अज्ञात आहे. तिने मुलाच्या वाढदिवशी स्वत:च्या मित्राशी स्वत:चेच लग्न करण्याचा घाट घातला. ती घटस्फोटित आहे आणि तिला या घटस्फोटित पतीपासून हा मुलगा झाला आहे. त्याच्या वाढदिवशी तिने समारंभपूर्वक स्वत:चे लग्न करुन घेतले आणि मुलाला सावत्र बाप भेट म्हणून दिला. अशी भेट देण्यासाठीच आपण मुलाच्या वाढदिनी स्वत:च्या लग्नाचाही मुहूर्त शोधला, असे तिचे म्हणणे आहे. तथापि, अनेकांना तिची ही कृती रुचलेली नाही. तिने असे करण्यापूर्वी मुलाला कल्पना द्यावयास हवी होती. शक्यतर त्याची अनुमती घ्यावयास हवी होती. सावत्र बाप हा मुलगा कसा स्वीकारेल ? आपल्या वाढदिनी केलेली मातेची ही कृती त्याच्या मनात मातेसंदर्भात अविश्वास आणि संताप निर्माण करेल अशा अनेक शक्यता व्यक्त होत आहेत.









