पलूस :
आई गावी गेल्या नंतर जन्मदात्या नराधम बापानेच पोटच्या बारा वर्षीय मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची दुदैवी घटना पलूस येथे घडली.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेने पलूस शहरातून संतापाची लाट उसळली आहे. सचिन रामचंद्र यादव (३६, रा. इनाम पट्टा कॉलनी पलूस) असे संशयित आरोपी चे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने पलूस पोलीस ठाण्यात पतीच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. पलूस पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ एप्रिल व १ मे रोजी पिडीत मुलगीची आई गावी गेली असल्याने तिच्या आजी जवळ झोपली होती. रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास नराधमाने तिला उचलून दुसऱ्या खोलीत नेले.
दमदाटी करून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठे काही सांगितलेस तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. पुढील काही दिवसांनी मुलीने तिच्या आईजवळ घडलेला प्रकार सांगितला. पतीच्या अमानुष कृत्याने पेटून उठलेल्या महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली. नराधमाच्या विरुद्ध फियाद दिली. पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ आरोपीला अटक केली. त्यांच्यावर बाल लैंगिक अपराध अंतर्गत कारवाई केली. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.








