एका पुरुषाची साडेपाचशे अपत्ये किंवा मुले असू शकतात, हे अनाकलनीय आहे. पण नेदरलँड (हॉलंड) या देशात असा एक पुरुषवीर आहे. त्याला 550 मुले आहेत. हे कसे शक्य आहे, असे आपल्याला वाटेल यात शंका नाही. उत्तर साधे आहे. एवढी संतती त्याला प्रत्यक्ष शरीरसंबंधांमधून झालेली नाही. तर त्याने ‘वीर्य’दान केल्याने हे शक्य झाले आहे. अर्थात हे दान विनामूल्य नाही. आपले वीर्य किंवा स्पर्मस् विकण्याचा त्याचा धंदा आहे. त्याच्या वीर्याच्या साहाय्याने अनेक महिला गर्भवती झाल्या आहेत. कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञान जे सर्वसामान्यांच्या भाषेत टेस्ट टय़ूब बेबी तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते, त्याचा हा प्रताप आहे.
या थोर पुरुषाचे नाव जोनाथन मेयर असे असून तो 41 वर्षांचा आहे. त्याने आपले वीर्य विकून मोठी संपत्ती कमावली. तो देखणा असल्याने त्याच्या वीर्याला मागणी मोठी आहे. त्यामुळे त्याचे भाग्य फळफळले. त्याने या मागणीचा पुरेपूर लाभ उठवत आपल्या वीर्याचाच धंदा करुन माता बनण्याची इच्छा असणाऱया महिलांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यात तर साहाय्य केलेच, शिवाय स्वतःचीही धन करुन घेतली. मात्र, आता त्याला या मार्गाने पैसा कमावता येणार नाही. कारण त्याच्या या ‘धंद्या’ची गंभीर दखल नेदरलँडच्या सरकारने घेतली असून त्याच्या वीर्यविक्रीवर बंदी घातली आहे. बंदी मोडून त्याने चोरटय़ा मार्गान वीर्यविक्री केल्यास त्याला 90 लाख रुपये दंड करण्यात येणार आहे.