हिडकल (ता.रायबाग) येथील घटना, हारुगिरी पोलिसांनी लावला छडा
प्रतिनिधी/ बेळगाव
दारु पिऊन घरातील व्यक्तींबरोबर दररोज भांडण काढणे, दारुसाठी पैसे मागणे, दुचाकी मागणे असे प्रकार सुरू केल्यामुळे वैतागून बापाने व दुसऱ्या मुलाने आपल्या मद्यपी मुलाचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून टाकला. मात्र ही घटना हारुगिरी पोलिसांनी उघडकीस आणून खून करणाऱ्या पिता, पुत्राला अटक केली आहे. हिडकल (ता. रायबाग) येथील घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सोमय्या महालिंगय्या हिरेमठ (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा खून करणारे वडील महालिंगय्या गुरुसिध्दय्या हिरेमठ (वय 54) आणि बसय्या महालिंगय्या हिरेमठ (वय 26, दोघेही रा. हिडकल, ता. रायबाग) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मयत सोमय्या याला दारुचे व्यसन होते. तो दारु पिऊन दररोज भांडण काढत होता. पैशाचीही मागणी करत होता.
सतत भांडण करत असल्यामुळे कंटाळून महालिंगय्या व त्याचा मुलगा बसय्या याने सोमय्याला जबर मारहाण केली. महालिंगय्या यांनी सोमय्या याच्या डोक्यात लाकडी पट्टीने प्रहार केला. यामध्ये सोमय्या याचा जागीच मृत्यू झाला. शनिवार दि. 8 रोजी रात्री ही घटना घडली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराच्या पाठिमागे असलेल्या जागेमध्ये त्याचा मृतदेह शनिवारी जाळून टाकण्यात आला.
हारुगिरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी चौकशी केली. महालिंगय्या व बसय्या यांची चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. हारुगिरीचे पोलीस निरीक्षक रामचंद्र बी. यांनी तपास करुन या दोघांना अटक केली व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे हिडकल परिसरात खळबळ माजली आहे.









