कोल्हापूर :
मुलांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या वडिलांचा झटापटीमध्ये खाली पडून मृत्यू झाला. मीर अहमंद अब्बस मुल्ला (वय 75 रा. सुतारमळा, लक्षतीर्थ वसाहत) असे मृतांचे नांव आहे. झटापटीमध्ये खाली पडून डोक्याला इजा झाल्याने मीर अहमंद मुल्ला यांचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास लक्षतीर्थ वसाहत येथील सुतारमळ्यात ही घटना घडली. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी गुलाब मीरअहमंद मुल्ला (वय 48), फिरोजी मीरअहमंद मुल्ला (वय 39) या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम कनेरकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मीरअहमद मुल्ला हे पत्नी रुक्साना व गुलाब, फिरोज आणि जावेद या तीन मुले व सुना, नातवंडांसह सुतारमळा येथे राहतात. मात्र या तीनही मुलांमध्ये गेल्या 10 वर्षापासून वाद असल्यामुळे एकाच घरात तीनही मुले आपल्या कुटूंबासह विभक्त राहतात. शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या मुल्ला यांची नातवंडे घरामध्ये गोंगाट करुन खेळत होती. याचवेळी गुलाबला फोन आल्यामुळे तो फोनवर बोलत होता. मुलांच्या आवाजामुळे त्याला फोनवरचे काहीच एwकू येत नसल्यामुळे त्याने लहान मुलांना गुलाब ओरडला. याच कारणातून गुलाब आणि फिरोज या दोघांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दोघांमध्ये झटापट सुरु झाली. ही झटापट सोडविण्यासाठी मीरअहमद गेले. यावेळी झटापटीमध्ये मीरअहमंद यांना गुलाब आणि फिरोज यांचा धक्का लागला. यामध्ये ते जमिनीवर कोसळले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान गुलाबने रागाच्या भरात घरातील पार आणून फिरोजवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिरोजने हा वार चुकविला आणि त्याच्या पत्नीला लागला. दरम्यान मीरअहमंद यांच्या नाकातून रक्त येवू लागल्याने पत्नी रुक्साना व तीनही मुलांना मीरअहमंद यांना घरामध्ये पाणी देवून झोपवले. फिरोजच्या पत्नीला पारीचा घाव लागल्यामुळे तो पत्नीस घेवून दवाखान्यात गेला होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मीरअहमंद हे निपचीत पडले होते ही बाब पत्नी रुक्साना यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ मीरअहमंद यांना सिपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान या प्रकरणी गुलाब मीरअहमंद मुल्ला आणि फिरोज मीरअहमंद मुल्ला या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.
- एकाच घरात राहूनही वितुष्ट
मीरअहमंद मुल्ला त्यांची पत्नी रुक्साना व तीन मुले सुना नातवंडे एकाच घरात विभक्त राहत होते. मात्र या चारही कुटूंबामध्ये टोकाचे वितुष्ट होते. गुलाब पेटींग व जागा खरेदी विक्रीचे काम करत होता, तो अविवाहीत आहे. तर फिरोज हा फिल्म लाईनमध्ये काम करतो. त्याचे लग्न झाले असून, एक मुलगा आहे. तर जावेद पडेल ती कामे करुन आपला उदरनिर्वाह चालवितो. गेल्या 10 वर्षापासून एकत्र राहूनही ते एकमेकांशी बोलत नव्हते.
- मालमत्तेच्या कारणातून वाद
मीरअहमंद मुल्ला हे उर्मिला टॉकीजमध्ये बुकींग मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांनी सुतारमळा येथे राहते घर आणखीन एक जागा विकत घेतली होती. ही सर्व मालमत्ता आमच्या नावावर करा असा तगादा मुलांनी मीरअहमंद यांच्याकडे लावला होता. मात्र त्यांनी यास नकार देत माझी सर्व मालमत्ता नातवांच्या नावावर करणे किंवा दान करेन मात्र तुम्हाला देणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. यामुळे मुल्ला कुटूंबात नेहमीच वाद होत होते.
- रविवारी सकाळी पंचनामा
मीरअहमंद निपचीत पडल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना सिपीआर रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कनेरकर आणि पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड हे सिपीआर रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाचे पथक दाखल झाले होते.








