हृदयद्रावक घटनेने कांदोळी गाव हळहळले : घटनेमागील गूढ कायम,पत्नी लग्नसमारंभासाठी गेली असता केले हत्याकांड

प्रतिनिधी /म्हापसा
ओर्डा – कांदोळी येथील जॉय फर्नांडिस यांनी पोटच्या दोन्ही मुलांची हत्या करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी उजेडात आली. या घटनेमागील गूढ अद्याप उजेडात आलेले नाही. कळंगूट पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन तिन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविले आहे. या दुहेरी हत्याकांड व आत्महत्येमुळे संपूर्ण गोव्यात हळहळ व्यक्त होत असून कांदोळी गावात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 2 वा. मयत जॉय यांची पत्नी इर्निया परेरा ई फर्नांडिस या एका लग्न समारंभासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या रात्री 10 वा. घरी आल्या असता बेल वाजवूनही कोणी दरवाजा उघडला नाही. त्यांनी तासभर दार ठोठावूनही कोणीही दरवाजा उघडत नसल्याने अखेर शेजाऱयांना बोलावून घेत घरामागील लोखंडी दरवाजा तोडून उघडण्यात आला. इर्निया यांन्<ााr घरात प्रवेश करुन पाहणी केली असता त्यांची मोठी मुलगी ऍनानिया फर्नांडिस (14 वर्षे) व छोटा मुलगा जोसफ फर्नांडिस (8) मृतावस्थेत आढळून आले. पती जॉय घरात कुठेच दिसून आला नाही. घटनेची माहिती लगेच कळंगूट पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथील गेमेकॉत पाठविले. पोलिसांनी त्वरित जॉय फर्नांडिसचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही.

मुलांचा गळा आवळून खून, नंतर आत्महत्या
रविवारी सकाळी जॉयचा मृतदेह घरामागील दाट झाडीतील एका झाडाला लोंबकळत असलेल्या अवस्थेत सापडला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या साहाय्याने मृतदेह खाली उतरवून शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला. जॉयने मुलगी ऍनानिया व मुलगा जोसेफचा ते कॉटवर झोपलेले असताना नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला व नंतर त्याच दोरीच्या साहाय्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 3 ते 5 वा.च्या दरम्यान मुलांची हत्या केल्याचा कयास पोलिसांचा आहे. दोन्ही मुले अभ्यासात तसेच इतर ऍटिव्हिटीमध्येही हुषार होती.
मयत जॉय फर्नांडिस हे तियात्र अकादमीवर पाच वर्षे कार्यरत होते. तेथील कामाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उत्तर गोवा जिल्हा पंचायत निवडणूक काँग्रेस पक्षाच्यावतीने लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी माजी सभापती तोमाझिन कार्दोज यांचे स्वीय सचिव म्हणूनही काही काळ काम केले आहे. गेली सात ते आठ वर्षे ते सामाजिक कार्यात कार्यरत होते. त्यांची पत्नी इर्निया फर्नांडिस या मेरशी येथील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांची मोठी मुलगी ऍनानिया ही दोनापावला येथील एका हायस्कूलमध्ये नववी इयत्तेत तर मुलगा पर्वरी येथील खासगी शिशुवाटीकेत शिकत होता.
जॉय यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले? नवरा – बायकोमध्ये भांडण झाले होते का? की या तिघांचाही कोणीतरी खून केला असावा अशा उलटसुलट चर्चा सध्या कांदोळी गावात चर्चेत आहेत. पती-पत्नीमध्ये कधीकधी खटकेही उडत होते मात्र एवढी टोकाची भूमिका घेण्यामागील कारण काय? या सर्व प्रश्नांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
माजी सभापती तोमाझिन कार्दोज यांनी मयत जॉय यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. आपल्या कार्यकाळात तियात्र अकादमीवर जॉय कार्यरत होता. गावातील चर्च संघटना तसेच काँग्रेस पक्ष गटसमितीवरही ते बराच काळ सक्रिय होते. सरपंच जोसेफ सिक्वेरा यांचे ते एकेकाळचे निकटवर्तीय होते तसेच आमदार मायकल लोबो यांचेही ते जवळचे होते, अशी माहिती कार्दोज यांनी दिली.
खुनाच्या दिशेने तपास सुरु : उपमहानिरीक्षक बॉस्को जॉर्ज
पोलीस उपमहानिरीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करुन पोलिसांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दत्तगुरु सावंत उपस्थित होते. दै. ‘तरुण भारत’शी बोलताना बॉस्को जॉर्ज म्हणाले की, या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. खूनाच्या दिशेने याचा तपास सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
तिघांच्या मृतदेहावर मंगळवारी अंत्यसंस्कार
दरम्यान, मयतांवर मंगळवारी कांदोळी येथील स्थानिक चर्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तत्पूर्वी चर्चेचे धर्मगुरुंचीही पोलीस जबानी घेणार आहेत. या घटनेबाबत शेजारी वा ग्रामस्थ काहीच बोलण्यास तयार नाही. या मुलांच्या हत्याकांडाने संपूर्ण गाव हादरलेला आहे.









