बारामती :
ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून निघालेल्या वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बारामती-मोरगाव रस्त्यावरील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात दुपारी 11.30 ते 12 च्या सुमारास घडली. या घटनेने बारामती परिसरासह इंदापूर तालुक्यातील सणसर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ओंकार राजेंद्र आचार्य (रा. सणसर, ता. इंदापूर, सध्या रा. खंडोबानगर बारामती, सई ओंकार आचार्य (वय 10) आणि मधुरा ओंकार आचार्य (वय 4) वर्षे अशी या अपघातात मृत पावलेल्या वडील आणि मुलींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार ओंकार आचार्य हे आपल्या दोन मुलोसह दुचाकीवरुन (क्र. एम. एच 42 बी 4844) खंडोबानगर चौकात निघाले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला हायवा ट्रकने (क्र. एम. एच.16 सीए0212) धडक दिली. या धडकेत हायवा ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडल्याने ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या मुली सई आणि मधुरा या गंभीर जखमी झाल्या. मात्र त्यांना रूग्णालयात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून त्यामध्ये हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर काही अंतरापर्यंत दुचाकी फरफटत नेल्याचं या दृश्यामध्ये दिसत आहे. या प्रकरणी अधिक तपास बारामती शहर पोलिसाकडून केला जात आहे.
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघात
बारामती शहरात जड वाहनांच्या बेदरकारपणे चालविण्यामुळे आणखी किती जणांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार अशी चर्चा बारामती येथे नागरिकामध्ये होत आहे. तसेच या चौकात स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी येथील स्थानिकांनी अनेकदा केली. मात्र संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे आजचा अपघात झाल्याची चर्चा अपघातस्थळी चालू होती.








