बेळगाव : शेततळ्यात बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. सौंदत्ती तालुक्यातील मळगली येथे रविवारी ही घटना घडली असून मुरगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शेतकरी बापलेकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बसवराज केंगेरी (वय 40), त्याचा मुलगा धऱ्याप्पा केंगेरी (वय 14) दोघेही राहणार मुरगोड अशी त्या दुर्दैवींची नावे आहेत. बसवराज आपला मुलगा धऱ्याप्पा व त्याचा मित्र भागाप्पा सन्नक्की यांना घेऊन कीटकनाशक पिकावर फवारणीसाठी पत्नीच्या गावी मळगली येथे गेला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे.
धऱ्याप्पा व भागाप्पा हे दोघे शेततळ्यातून पाणी आणण्यासाठी गेले होते. दोघेही तळ्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी बसवराजने शेततळ्यात उडी घेतली. भागाप्पाला वाचवले. आपला मुलगा धऱ्याप्पाला वाचवताना दोघांचाही बुडून मृत्यू झाला. भागाप्पावर बैलहोंगल येथील सरकारी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच मुरगोडचे पोलीस निरीक्षक आय. एम. मठपती व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेत बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्यासोबत गेलेल्या मुलाला त्यांनी वाचविले.









