प्रतिनिधी /मडगाव
फातर्पा पंचायतीचे क्लार्क संतोष कृष्णा नाईक हे कुत्र्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्लार्क संतोष नाईक हे आपल्या कुत्र्याला दररोज पंचायतीत आणतात. त्यामुळे याच पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 6च्या पंच सदस्या श्रीमती जेनिफर फर्नांडिस यांनी पंचायत उपसंचालकांकडे लेखी तक्रार केली आहे.
आपल्या तक्रारीत जेनिफर फर्नांडिस यांनी पंचायतीचे क्लार्क संतोष नाईक हे आपल्या पाळीव कुत्र्याला पंचायतीत घेऊन येतात. हा कुत्रा सतत भुंकतो त्यामुळे पंचायत कार्यालयात प्रवेश करणे कठीण होते. हा मुद्दा पंचायतीच्या 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या मासिक बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी पंचायत सचिव व सरपंच यांना संतोष कृष्णा नाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती असे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत पुढे म्हणतात, बैठकीनंतर पंचायत अधिकाऱयांनी संतोष नाईक यांना त्यांचा कुत्रा पंचायत कार्यालयात आणू नका असा इशारा दिला होता. मात्र, त्यांनी या इशाऱयाकडे दुर्लक्ष केले. काल पंच सदस्या जेनिफर फर्नांडिस यांनी पंचायतीला भेट दिली असता, त्यांना पंचायतीत कुत्रा आढळून आला. यावेळी त्यांनी सरपंच व सचिवांनी कुत्र्याला आत येण्यापासून रोखण्यासाठी अधिकाऱयांनी दिलेल्या इशाराबद्दल विचारणा केली असता, संतोष नाईक यांनी वाद घालण्यास सुरवात केली व आपल्याला पंचायत कार्यालयाचा जीना देखील चढू देणार नाही अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
क्लार्क संतोष नाईक यांचे हे वर्तन अयोग्य असून ते स्वीकारले जाऊ शकत नाही. कुत्र्याचा उपद्रव थांबवण्यासाठी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.









