दोन्ही दरवाजातून लोंबकळतच प्रवास : बस अपुऱ्या असल्याचा परिणाम
वार्ताहर /धामणे
धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी या गावाना शाळा कॉलेजच्या वेळेत अपुऱ्या बसमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. या भागातून शेकडो विद्यार्थी शाळा कॉलेजसाठी बेळगाव शहरात दररोज ये-जा करत असतात. परंतु सकाळी शाळेला जातेवेळी विद्यार्थ्यांना बस अपुरी पडत आहे. कारण शेकडो विद्यार्थ्यांना एका बसमधून जागा होत नाही. त्यामुळे बसमध्ये गर्दी झाल्यामुळे अनेक विद्यार्थी बसच्या दोन्ही दरवाजातून लोंबकळत जात आहेत. त्यामुळे एखादा विद्यार्थी पडून मोठी दुर्घटना होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.बेळगाव ते धामणेहून पुढे कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी व देवगणहट्टी या सर्व गावाना दोन बसेस दिवसातून 15 ते 16 वेळा ये-जा करतात. परंतु विद्यार्थ्यांच्या शाळेच्यावेळी सकाळी एकच बस येत आहे. त्यामुळे सकाळी मासगौंडहट्टी, देवगणहट्टी व कुरबरहट्टी येथील विद्यार्थ्यांनी बसफुल होते. त्यामुळे धामणे गावातील विद्यार्थ्यांना या बसमध्ये जागाच होत नाही.
त्या बसमध्ये काही विद्यार्थी बसच्या दरवाजातून लोंबकळत येतात आणि काही विद्यार्थी घरी परततात, तर काही विद्यार्थी कुणाच्या तरी दुचाकीवरून तर काहीजण वडापमधून येतात. या रोजच्या प्रकाराने विद्यार्थी आणि पालक वैतागून गेल्याचे विद्यार्थ्यांकडून व पालकाकडून चिंता व्यक्त करत सांगितले.ग्रामपंचायतकडून बसच्या अधिकाऱ्याना या समस्येबद्दल अनेकवेळा भेट घेवून शाळेच्या वेळेत सकाळी व संध्याकाळी दोन बसेस जादा सोडा असे लेखी निवेदन देवून मागणी केली असल्याचे धामणे ग्राम पंचायतकडून सांगण्यात आले. निदान आतातरी बसच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी काही दुर्घटना व्हायच्या आत विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळेत सकाळी आणि संध्याकाळी शाळा सुटतेवेळी जादा बस सोडून आता उद्भवत असलेली विद्यार्थ्यांची समस्या दूर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.









