कोल्हापूर :
पैलवानावर प्राणघातक हल्ला करुन त्याचे करिअर संपुष्ठात आणणाऱ्या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी चौघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 19 ऑगस्ट 2018 मध्ये सोंडोली ता शाहूवाडी येथे ही घटना घडली होती. यामध्ये पैलवान संजय राजाराम जाधव ( वय 37 ) हे गंभीर गंभीर जखमी झाले होते. सरकारी वकील म्हणून मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.
भरत भीमराव पाटील (वय 27), दीपक बाळासो इथापे ( वय 33), मयूर महादेव सावंत ( वय 26 ), विजय बाळू साखरे ( वय 29 रा. सोंडोली ता. शाहूवाडी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी संजय जाधव हा फिर्यादी लक्ष्मी जाधव यांचा सख्खा लहान भाऊ आहे. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10वाजता संजयने याने आरोपींना त्यांचे शेतात असलेले टॉवर चोरीला गेल्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी महेश पाटील व त्याचे वडिल बाबूराव पाटील यांनी त्यांचा मुलगा गणेश व पुतण्या मयूर सावंत यांनी ते रॉड आणल्याचे सांगितले. तसेच ते परत देणेचे कबूल केले होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास संजय जाधव हा त्याच्या घरात टि.व्ही. पहात बसला होता. यावेळी चारही आरोपी गणेश पाटीलसह संजय जाधव यांच्या घराचे दारात आले. गणेश पाटील बाहेर मोटर सायकलजवळ उभा राहिला व अन्य चारही आरोपी घरात घुसत, मयूर सावंत याने संजय यास तू आमच्यावर चोरीचा आळ घेतोस काय असे म्हणून पाठीमागून मिठी मारली, दिपक इथापे व विजय साखरे यांनी संजय यास घट्ट पकडून धरले व भरत पाटील याने त्याच्या हातातील चाकूने संजयवर वार केले. गळयाजवळ, डाव्या डोळयाजवळ व डाव्या डोळयाचे वर वार केल्याने, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवू लागला. लक्ष्मी हिने मोठयाने आरडाओरडा केल्याने, घराच्या समोरील नागरिक गोळा झाले. नागरिकांनी जखमी संजयला हल्लेखोरांचा तावडीतून सोडवले.
दरम्यान हल्लेखोर हातातील हत्यारासह मोटर सायकल तिथेच टाकून पळून गेले. त्यावेळी फिर्यादीने मोटर सायकलची चावी काढून घेणेचा प्रयत्न करत असताना गणेश पाटील याने फिर्यादीला धक्का मारुन मोटर सायकल घेवून त्याचे घराकडे गेला. नागरिकांनी संजयला कराड येथे अॅडमिट केले. शाहूवाडी पोलिसांनी चारही संशयितांना अटक करून त्यांच्यावर दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणी सरकारी वकिल मंजुषा बी. पाटील यांनी एकुण बारा साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी लक्ष्मी जाधव, निवृत्ती सावंत, महेंद चोरगे व विवेक पाटील, निवेदन व जप्ती पंच बाबूराव डिगे व वैद्कीय अधिकारी डॉ. संकेत प्रभूणे यांच्या साक्षी अत्यंत महत्वपुर्ण ठरलया. सरकारी वकिल मंजुषा बी. पाटील यांनी केलेला युक्तीवाद व साक्षी पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
- पैलवान संजय जाधव यांची वाचा आणि दृष्टी गेली
पैलवान संजय जाधव यांच्यावर चौघांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले होते. हा वार खोलवर गेल्याने गळ्यातील सुर देणारी नस कट झाली, यामुळे त्यांचे पुन्हा ऑपरेशन करावे लागले. तसेच डोळ्यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांची दृष्टी गेली आहे. यामुळे त्यांना पुन्हा पैलवानकी करणे शक्य झाले नाही.








