भरदुपारी हल्लेखोरांनी बेडरपणे केली मारहाण : चाकू, पिस्तूल, केबलसह लाथाबुक्क्यांचा मार
पणजी : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला पोचली असून गुंडाराजने पुन्हा डोके वर काढले आहे. करंजाळे येथे सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर यांच्यावर काल गुऊवारी भर दिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांकडे चाकू, पिस्तूल आणि केबल होते. काणकोणकर यांना वाचविण्यासाठी आलेल्या पत्रकाराला चाकूचा धाक दाखवून बाजूला केले. चारजणांनी काणकोणकर यांना पकडले तर दोघांनी त्याला केबलने जबर मारहाण करून तोंडाला शेण फासले व रस्त्याच्या बाजूला टाकले.
पणजी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 109, 351(3) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. ‘गोंयचो राखणदार’ व्हायचेय का, असे विचारून आपल्याला सहा जणांनी मिळून मारहाण केल्याचा दावा रामा काणकोणकर यांनी केला आहे. आपण करंजाळे येथे दुपारी जेवायला गेलो असताना मारहाणीची घटना घडली. हल्लेखोरांनी यापूर्वी देखील तिघांनी मिळून आपल्याला मारहाण केली होती. त्यातील एकजण आजच्या मारहाणीत सहभागी होता, असे काणकोणकर यांनी सांगितले.
रामाची पोलिसांवर नाराजी
मारहाणीबाबत त्यांनी अनेकांवर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्याला बांबोळी येथे मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत आपण पोलिसांना माहिती दिली होती. मात्र नाममात्र कारवाई करून प्रकरण थंड करण्यात आले होते. त्यामुळे हल्लेखोरांनी दुसऱ्यांदा आपल्यावर हल्ला केला, असे काणकोणकर म्हणाले. दरम्यान, मारहाणीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी बरेच लोक जमा झाले होते. रामा काणकोणकर हे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. आपण व इतरांनी मिळून त्याला रस्त्याच्या बाजूला नेल्याचे एका महिलेने सांगितले. उशिरा आलेल्या ऊग्णवाहिकेतून काणकोणकर याला बांबोळी येथे नेऊन गोमेकॉत भरती करण्यात आले.
बड्या धेंडांचा पाठिंबा?
या मारहाणीबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहिल्यास अशी घटना गोव्यात घडली का असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. असे प्रकार अन्य राज्यांमध्ये घडत असल्याचे ऐकायला येत होते, आता हे प्रकार गोव्यात घडत असल्याने गोव्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बड्या धेंडांचा पाठिंबा असल्याशिवाय असे प्रकार घडणे कठीण आहे. बेडरपणे ते हल्ला करीत होते. म्हणजे त्यांना कुणाचा तरी पाठिंबा होता, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी गोव्यात अशीच बंडाळी माजली होती. गुंडांनी डोके वर काढले होते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांनी या गुंडांचे कंबरडे मोडले होते. गुंडागीरी संपुष्टात आणली होती. आता गुंडांनी पुन्हा डोके वर काढले असून त्यांच्यावर वेळीच कारवाई होणे काळाची गरज आहे.
असे प्रकार खपवून घेणार नाही
समाजसेवक रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यासंबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी, सरकार भविष्यात असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर यात गुंतलेल्या सर्वांना त्वरित अटक करण्यात यावी, असे निर्देश पोलिसांना दिले असल्याचे सांगितले आहे.
-मुख्यमंत्री प्रमोद सावंत
पाच जणांना अटक
सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकरवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील पाच जणांच्या काही तासांतच मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून सहावा हल्लेखोर अद्याप हाती लागलेला नाही. इंटेलिजेंस इनपुटवर कार्यवाही करून, पोलिसांनी अँथनी नादर (31) आणि फ्रान्सिस नादर (28) या दोन संशयीतांना दोडामार्ग बस स्टँडवर पकडले. या दोघांच्या चौकशी केली असता अन्य साथिदार मडगाव येथून ट्रेनने कर्नाटकला पळून जाण्याची योजना आखत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून सुरेश नाईक (31) पर्वरी, मिंगेल आराऊजो (24), सांताक्रूझ आणि मनीष हडफडकर (24) – या तिघांना रात्री 9 च्या सुमारास मडगांव रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. या कारवाईसाठी एसडीपीओ पणजी यांच्या नेतृत्वाखाली 31 जवानांचे एकूण आठ पोलिस पथक संशयितांचा मागोवा घेण्यासाठी तैनात करण्यात आले होते. हे सर्व संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहाव्या संशयिताचा शोध सुरू आहे.









