ऑनलाईन टीम / तरुण भारत :
औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे (Bhausaheb Tarmale) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरमळे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पांडुरंग नागे, आकाश नागे, अनिकेत नागे, अशोक नागे, राजु बनकर, दिनेश राठोड, सुनिल खरात असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिक वाचा : किम जोंग यांचा नववर्षाचा नवा संकल्प
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत तळमळे यांच्या आई विजयी झाल्या. याचा राग मनात धरुन विरोधी गटातील अनिकेत नागे याने शनिवारी रात्री अचानक तरमळे यांच्या डोक्यात आणि मानेवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात तरमळे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून तरमळे यांना तत्काळ सिग्मा रुग्णालयात दाखल केले. मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तरमळे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.