बसने पेट घेतल्याने होरपळून मृत्यू : 8 प्रवासी जखमी : मध्यरात्री बुलढाण्याजवळील दुर्घटना
प्रतिनिधी/ बुलढाणा
नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले आहेत. मध्यरात्री दीड वाजता समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर स्फोट होऊन संपूर्ण बस पूर्णपणे जळून त्यामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मफत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आले नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले असल्याची माहिती बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
अपघात झालेली बस विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस होती. बस शुक्रवारी रात्री 9.30 वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती. कुणी शिक्षणासाठी घर सोडून पुण्याची वाट धरली होती तर कुणी नोकरीसाठी आई-बाबांचा निरोप घेऊन जन्मभूमी सोडून कर्मभूमीची वाट धरली होती. त्यांना कुठं ठाऊक होतं की हा निरोप शेवटचा असेल. तिकीट काढताना त्यांना वाटलंही नसेल, त्यांचा हा प्रवास शेवटचा असेल. समुद्धी महामार्गाच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अपघात ठरला आहे.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
अपघाताची माहिती मिळताच पिंपळखुटा येथील नागरिक मदतीसाठी पोहोचले. दोन वाजण्याच्या आसपास अग्निशमन दलाच्या गाड्याही पोहचल्या. पोलीसही घटनास्थळावर दाखल झाले होते. मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी जळालेल्या बसमधून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेसात वाजेपर्यंत 25 मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर आठ वाजता फॉरेन्सिक टीमने घटना स्थळाचा आढावा घेतला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुर्घटना बसचा टायर फुटल्याने झाली नसून चालकाचे नियंत्रण सुटल्याने
नागपूरहून पुण्यात येत असताना विदर्भ ट्रॅव्हल्स च्या खाजगी बसला झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. बुलढाण्यातील ही दुर्घटना बसचा टायर फुटल्याने झाली नसून हा अपघात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागाने दिला आहे. बस चालकाने रसच्या लगतच्या विजेच्या खांबाला धडक दिली, त्यानंतर बस पलटली, डिझेल टंकीने पेट घेतला. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं बस चालकाने सांगितलं होतं मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आला आहे. आता या अहवालामुळे घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. बुलढाणा येथील अपघातस्थळाची पाहाणी केल्यानंतर अमरावती आरटीओने हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.सुरूवातीला बसचा टायर फुटला त्यानंतर ती दुभाजकाला जाऊन धडकली, पलटी झाली आणि त्यानंतर बसने पेट घेतला अशी माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आता पहिल्यांदा बसचा टायर फुटला नसून चालकाचे नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे.
अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
समफद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अपघातस्थळाला मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट :
या अपघातस्थळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत शनिवारी दुपारी भेट दिली. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आकाश फुंडकर, श्वेता महाले, विभागीय आयुक्त निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा –
दुर्देवी अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणाही केली. मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
प्रत्येक जीव महत्वाचा, असे अपघात होऊन चालणार नाही : मुख्यमंत्री
ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. असे अपघात होऊन चालणार नाहीत. प्रत्येक जीव महत्वाचा आहे. सगळ्या उपाययोजना करण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवाजा खाली अडकल्याने प्रवाशांना बाहेर येता आले नाही. नाहीतर प्रवासी वाचले असते असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. काही बाबतीत ते घटना दिसत नाही. अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक, 2 लाखांची मदत
बुलढाणा बस अपघाताच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.