पुणे / प्रतिनिधी :
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडे जाणाऱया लेनवर बंद पडलेल्या ट्रकला खासगी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पोलीस शिपायासह चार जणांचा मृत्यू झाला, तर 20 प्रवासी जखमी झाले. बुधवारी पहाटे हा अपघात झाला.
पुणे शहर पोलीस दलात सायबर सेलमध्ये कार्यरत असलेले नितीन दिलीप शिंदे (वय 36 रा. हडपसर पुणे) तसेच आरती बिराजदार (वय 25 रा. पुणे), अमित कलशेट्टी (वय 20, रा. सोलापूर), गणपत पाटील (वय 55, रा. कात्रज, पुणे) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
या बसमधून 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. बुधवारी पहाटे साडेचार ते पावणे पाचच्या सुमारास चौफुलीजवळ वाखारी गावच्या हद्दीत बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटले व बसने बंद पडलेल्या ट्रकला मागून धडक दिली. अपघातानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट दिली. यवत पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर यवत पोलिसांनी जखमींना केडगाव चौफुली व लोणी येथील विश्वराज रुग्णालयात उपचारांसाठी तातडीने हलवले.
पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचाही मृतांमध्ये समावेश
पोलीस नाईक शिंदे हे सोलापूरहून पुण्याकडे घरी परतत होते. पण रस्त्यातच त्यांना काळाने गाठले. या अपघातात मरण पावलेले नितीन दिलीप शिंदे हे पोलीस नाईक या पदावर हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते एक उत्कृष्ट खेळाडू होते. ऍथलेटिक्स प्रकारात ते उत्कृष्ट रनर होते. पुणे शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना विविध गुन्हय़ांतील आरोपी पकडण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. हडपसर पोलीस स्टेशनमध्येही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नितीन शिंदे यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक उमदा व चांगला सहकारी अपघाती निधनात गेल्याची दु:खद भावना हडपसर पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. शिंदे हे कुटुंबातील कर्ते होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुली संस्कृती (वय 13 ) व गिरीजा (वय 11) असा परिवार आहे.