ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ इको कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात साताऱ्यातील दोघांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय 24) व गणेश बाळू कोंढाळकर (22, रा. कोंढावळे, ता. वाई, जिल्हा. सातारा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरने नवी मुंबई येथे जाण्यासाठी मारुती इको कारने 15 जण प्रवास करत होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ केए 56 – 2799 हा ट्रक रस्त्याच्या कडेला पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी उभा होता. यावेळी भरधाव वेगातील कारने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी गंभीर होती की, इको कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. त्यामधील सहा जण गंभीर जखमी आहेत. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी कारचालक अंकुश जंगम याने हयगयीने, बेदारकापणे, निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहन चालवून, लेनची शिस्त न पाळता अपघात घडवल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.