वृत्तसंस्था/ अलीगढ
उत्तरप्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यात चार मित्रांचा रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. चारही मित्र एकाच बाइकवर बसून बुलंदशहरातून अलीगढमधील दसऱ्याचा मेळा पाहण्यासाठी आले होते. तेथून परताना त्यांची बाइक एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली, या दुर्घटनेत चारही मित्रांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
बुलंदशहर जिल्ह्यातील दौलतपूर खुर्द गावातील विकास, सुनील, यश शर्मा आणि रवि हे एकाच बाइकने अलीगढच्या छेरत येथे गेले होते. तेथून परतताना एका गेस्ट हाउसनजीक त्यांची बाइक ट्रॅक्टर ट्रॉलीला जाऊन धडकली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकांचे वय 18-22 वर्षांदरम्यान होते. रविवारी पहाटे या दुर्घटनेची माहिती मिळाली होती असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मयंक पाठक यांनी दिली आहे.









