कट्टा / वार्ताहर
Fast unto death on May 1 for the transfer of Pendur Village Development Officer!
मालवण तालुक्यातील खरारे पेंडूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी यांची पेंडूर खरारे ग्रामपंचायत मधून बदली करावी व ग्रामपंचायतीला हुशार व जबाबदारीने कारभार सांभाळणारे ग्रामविकास अधिकारी द्यावेत अशा प्रकारची वेळोवेळी निवेदने देऊनही कोणत्याही तालुका वा जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने खरारे पेंडूर गावचे माजी सरपंच साबाजी बाबू सावंत यांनी १ मे २०२३ महाराष्ट्र दिनाचे दिवशी आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे. खरारे पेंडूर ग्रामपंचायत ही 12 वाड्यांची मोठी लोकसंख्या असलेली आणि नेहमीच संवेदनशील राहीलेली ग्रामपंचायत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत आहे. त्यात प्रशासनाने दिलेले ग्रामविकास अधिकारी बेजबाबदार, निष्क्रिय, कामचुकार आहेत. ग्रामसभेचा अवमान करणे येणाऱ्या नागरिकांना उत्तर न देणे असा प्रकार वारंवार घडतो. त्यामुळे अशा बेजबाबदार ग्रामविकास अधिकारी यांची तात्काळ बदली करावी याबाबत साबाजी सावंत यांनी यापूर्वी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरुपात तक्रार वजा विनंती स्वरूपात लेखी निवेदने दिलेली होती. परंतु या विषयाचा कोणत्याही प्रकारे गांभीर्याने विचार केला जात नाही तसेच याची गांभीर्याने दखलही घेतली जात नाही. त्यामुळे १ मे पूर्वी सदर ग्रामविकास अधिकारी यांची बदली न झाल्यास गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर आपण उपोषण करणार आहोत असे पत्र माजी सरपंच सामाजिक सावंत यांनी तालुका व जिल्हा प्रशासन यांना दिले आहे. या निवेदन पत्रात त्यांनी माझी बायपास सर्जरी झाली असून उपोषण कालावधीमध्ये माझी कोणत्याही प्रकारे प्रकृती बिघाड झाल्यास अथवा मला शारीरिक त्रास झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील हजारो रुपये शासनाचा पगार घेऊन ग्रामविकास अधिकारी काडीचेही काम करत नाही.
या ग्रामविकास अधिकारी ज्या प्रकारे ग्रामपंचायत प्रशासन हाताळायला हवे त्या प्रकारे हाताळता येत नाही. कोणत्याही विषयाचे गांभीर्य या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे नाही. कोणताही प्रश्न विचारल्यास त्यावर निरुत्तर राहून फक्त मान खाली घालून राहणे आणि फक्त ग्रामपंचायतीचे चेक काढणे एवढेच काम केले जाते तरी अशा निष्क्रिय ग्रामविकास अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा १ मे रोजी आपण गावातील ग्रामस्थांना घेऊन ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीसाठी मालवण पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार आहोत असा इशारा माजी सरपंच साबाजी सावंत यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग, व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना दिले आहे.









